दिल्ली डायरी – देवभूमीतील हिंदूविरोधी धुमशान

522

>> नीलेश कुलकर्णी

‘देवभूमी’ म्हणून ओळख असलेल्या उत्तराखंडमध्ये सध्या जबरदस्त ‘धुमशान’ सुरू आहे. या देवभूमीतील हिमलहरींनी नेहमी देश गारठत असतो. मात्र हेच राज्य सध्या तापले आहे. मुख्य म्हणजे हे धुमशान काही ‘तुकडे तुकडे गँग’नी आणलेले नाही की पाकिस्ताननेही ‘प्रायोजित’ केलेले नाही. ते निर्माण केले आहे ते हिंदुत्वाची जपमाळ ओढणाऱया भाजपच्या उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी.

दैवाने दिले तरी कर्माने उपभोगता आले पाहिजे, असे म्हणतात. केवळ नशिबाने उत्तराखंडचे मुख्यमंत्री झालेल्या त्रिवेंद्रसिंह रावत यांना ही म्हण तंतोतंत लागू पडते. या त्रिवेंद्र महाशयांनी हिंदूंसाठी परमपवित्र असलेल्या बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधामांचे ‘देवस्थान प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध उत्तराखंडात जोरदार असंतोष उमटू लागला आहे. या निर्णयाविरुद्ध देवभूमीतील साधू, महंत, पंडित, विद्वान आणि पुजारी मंडळी हातात कमंडलू घेऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहेत. एकवेळ हेच काम काँग्रेस सरकारने केले असते (जे आतापर्यंत उत्तराखंडमधल्या कोणत्याही काँग्रेस सरकारने केलेले नाही) तर काँग्रेसला ‘हिंदूविरोधी’ ठरवून याच भाजप आणि संघपरिवारातल्या मंडळींनी शंखनाद केला असता, मात्र त्रिवेंद्रसिंग रावतांच्या हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांत लुडबूड करण्याच्या आगाऊ आणि आगलावू भूमिकेवर भाजप आणि संघपरिवाराने ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’ ची सोयिस्कर भूमिका घेतली असली तरी सुब्रमण्यम स्वामी नावाच्या एका बहाद्दर भाजप खासदाराने हिंदूंच्या बाजूने या वादात उडी घेतली आहे. हे बरे झाले. या स्वामी महाराजांचा आजवरचा ‘ट्रक रेकॉर्ड’ पाहिला तर हे स्वामी ज्यांना ज्यांना आडवे गेले त्यांना धारातीर्थी पडावे लागले आहे. गांधी परिवार ते चिदंबरम वगैरेपर्यंत सर्वांना हे एकटे सुब्रमण्यम स्वामी पुरून उरले आहेत. हिंदूधर्मीयांच्या भावनांना हात घालणाऱया त्रिवेंद्र सरकारला हे स्वामी ‘चारधाम यात्रे’ला पाठवतील यात शंकाच नाही.

उत्तराखंडच्या स्थापनेनंतर तिथे नारायणदत्त तिवारींचे काँग्रेस सरकार सत्तेवर आले. त्यापूर्वी उत्तर प्रदेशचा भाग असलेल्या उत्तराखंडच्या पवित्र चारधामला भाजपच्या भाषेत ‘मुस्लिमधार्जिण्या’ असलेल्या मुलायमसिंह यादव किंवा मायावतींसारख्या धर्मनिरपेक्ष नेत्यांनीही कधी हात लावला नव्हता. ते पातक संघाचे स्वयंसेवक असलेल्या त्रिवेंद्रसिंग रावतांनी केले आहे. चारधामचे आपले एक धार्मिक महत्त्व आहे आणि तिथला कारभार त्या त्या ठिकाणची साधुसंत आणि पुजारी मंडळी इतकी वर्षे पाहत आहेत. आता त्यात सरकारी लुडबूड करून त्रिवेंद्रसिंग रावतांनी हिंदूधर्मीयांचा नाहक रोष ओढवून घेतला आहे. भाजप सरकारच्या या हिंदूविरोधी भूमिकेविरोधात संतमंडळींनी सुब्रमण्यस स्वामींची भेट घेऊन त्यांना लक्ष घालण्याची विनंती केल्यावर स्वामींनी ‘मंदिरे चालवणे हे सरकारचे काम नाही’ अशी डरकाळी फोडत न्यायालयात सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करत या वादात उडी घेतली आहे. विकासाच्या नावावर भाजपने देशातील सर्वसामान्य जनतेचा आणि हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्ववादी जनतेचा आजवर अपमानच केला आहे. भाजपला हिंदुत्वाची गरज केवळ धार्मिक ध्रुवीकरणासाठी भासते हे दिल्लीच्या ‘शाहीनबाग’ ने दाखवून दिले आहे, मात्र भाजपच्या बेगडय़ा हिंदुत्वाला दिल्लीत 81 टक्के हिंदू असूनही दिल्लीकरांनी चपराक लगावली आहे. हिंदूंच्या भावना आणि चारधाम यांचे धार्मिक महत्त्व श्रेष्ठ आहे. जगभरातून लोक या देवभूमीत एका पवित्र भावनेने येतात. त्याचे सरकारीकरण करून त्रिवेंद्रसिंग नेमके कोणाचे भले करू इच्छितात, याचे उत्तर भाजपने द्यायला हवे. चारधामला हात घालणे म्हणजे आगीशी खेळणे आहे. ‘मुंह मे राम बगल में छुरी’ ही नीती आता चालणार नाही. त्रिवेंद्र सरकारने वेळीच सावध होऊन आपली घोडचूक दुरुस्त केली नाही तर त्याचे विपरीत परिणाम होतील हे निश्चित!

जावडेकर, जाजू आणि सातव

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले…’ असे ऐतिहासिक उद्गार सेनापती बापट यांनी काढले होते आणि स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या इतिहासाची पाने चाळली तर महाराष्ट्राविना देशाचे पानही हललेले नाही. नामदार गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते स्वातंत्र्योत्तर काळातील यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंतच्या नेत्यांचा एक कर्तबगार आणि दिल्लीत आपला ठसा उमटवणाऱया नेत्यांचा महाराष्ट्राला इतिहास आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक भाजपने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उंचीवर नेऊन ठेवली. अरविंद केजरीवालांसारख्या एका फाटक्या माणसाला हरविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली, मात्र पदरी मोठे अपयश पडले. भाजपकडून ही दिल्लीची निवडणूक हाताळली ते मराठी नेते असलेल्या प्रकाश जावडेकर आणि शाम जाजू यांनी. यापैकी जाजू हे गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीचे भाजपचे प्रभारी आहेत तर जावडेकरांना भाजप नेतृत्वाने निवडणूक प्रभारी केले होते. जावडेकर जिथे जातील तिथे पक्षाचा सुपडा साफ होतो असा जबरदस्त ‘ट्रक रेकॉर्ड’ असतानाही त्यांना दिल्लीची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे ‘निकाल’ अर्थातच ‘अपेक्षे’प्रमाणेच लागला असे म्हणावे लागेल. दुसरीकडे काँग्रेसमध्ये राजीव सातव यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी होती. मात्र त्यांना दिल्लीकरांमध्ये काँग्रेसची इमेज काही बनवता आली नाही. ज्या शीला दीक्षितांनी दिल्लीवर निर्विवादपणे 15 वर्षे सत्ता गाजवली आणि दिल्लीला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले त्या दिल्लीत काँग्रेसला पाच वर्षांपूर्वीप्रमाणेच ‘झीरो फिगर’ मेंटेन करावी लागली असेल त्यापेक्षा दुर्दैव ते कोणते.

‘थँक्स’.. राजनाथजी..!

देशाचा अर्थसंकल्प मांडून आता बरेच दिवस लोटले असले तरी अर्थसंकल्पाचे कवित्व अजून काही संपता संपत नाहीये. निर्मला सीतारामन यांच्या रूपाने एका महिलेने अर्थसंकल्प मांडला म्हणून त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पावेळी कौतुकाचा प्रचंड वर्षाव झाला होता. तो साहजिकही होता आणि त्या अभिनंदनास पात्रही होत्या. मात्र कारकीर्दीतील दुसरा अर्थसंकल्प मांडल्यानंतर याच निर्मलाताई टीकेचे लक्ष्य बनल्या आहेत. याचे मूळ कारण म्हणजे अर्थव्यवस्थेची झालेली ससेहोलपट. अर्थमंत्री म्हणून निर्मलाताईंना किती ‘अधिकार’ आहेत याची सर्वांनाच कल्पना असली तरी त्यांच्या कारकीर्दीत देशाची अर्थव्यवस्था सर्वाधिक रसातळाला गेली हे वास्तव नाकारून चालणार नाही. निर्मलाताईंनी अर्थसंकल्पाच्या इतिहासातील सर्वात मोठे लांबलचक पावणेतीन तासांचे भाषण केले. त्यावरही मोठी टीका झाली. ‘भाषण मोठे केल्याने विकास दर वाढणार नाही’ अशी टीका झाली, तर अर्थतज्ञ असलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘निरर्थक भाषण’ अशी या भाषणाची संभावना केली. वास्तविक, पावणेतीन तासांच्या भाषणात निर्मलाताई पूर्णपणे थकून गेल्या होत्या आणि त्यांचे भाषण ऐकून खासदारही जांभया देत होते. मात्र समोर मोदी-शहा जोडीचा ‘चेहरा’ दिसत असल्याने ‘उसने अवसान’ आणून त्या बोलत होत्या. त्यांची ही ‘अवघडलेली अवस्था’ लक्षात घेऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक चिठ्ठी त्यांच्यासमोर सरकवली. तुमचे उरलेले भाषण अध्यक्षांची परवानगी घेऊन तुम्ही सभापटलावर ठेवा. दमलेल्या निर्मलाताईंनी घशाला कोरड पडलेली लक्षात आल्यावर हेच केले. निर्मलाताईंच्या या कृतीने जांभया देणाऱया खासदारांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आणि माझ्यासकट सगळ्यांनाच तुम्ही ‘संकटा’तून सोडवले अशाच भावनेने जणू भाषणानंतर निर्मला यांनी राजनाथ सिंहांचे ‘थँक्स राजनाथजी’ म्हणत खास आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या