अकाली दलापाठोपाठ ‘जेजेपी’चाही भाजपला धक्का,दिल्ली विधानसभा निवडणूक लढणार नाही

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 24 तासांत भाजपाला दुसरा धक्का बसला आहे. भाजपाचा महत्त्वाचा सहकारी शिरोमणी अकाली दलानंतर आज मंगळवारी हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जननायक जनता पार्टी यांनीही दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जेजेपी सहभागी होणार नाही असे चौटाला यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जेजेपीने ज्या जागांवर आपला दावा सांगितला होता त्या सर्व जागांवर भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. हेदेखील जेजेपीने निवडणुकीतून काढता पाय घेण्याचे मोठे कारण आहे.

जेजेपीआधी अकाली दलाने 20 जानेवारी रोजी विधानसभा निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत भाजपाच्या भूमिकेमुळे अकाली दलाने विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत कालकाजी, टिळक नगर, हरी नगर आणि राजौरी गार्डनसारख्या ठिकाणी अकाली दलचा प्रभाव आहे. अकाली दलने भाजपाला आपण सांगितलेला जागांचा फॉर्म्युला मान्य नव्हता असा दावा केला आहे.

सीएएबाबत पुनर्विचार करण्याची अकाली दलाची मागणी
भाजपासोबत झालेल्या तीन बैठकांमध्ये अकाली दलाकडून भाजपाला सीएएबाबत पुनर्विचार करण्याची मागणी ठेवण्यात आल्याचे अकाली दलचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले. यावर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय अकाली दलचा असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या