लाल किल्ल्याजवळील स्फोट आत्मघाती हल्ला! मृतांचा आकडा 13, गृह खात्याचे पुन्हा अपयश; पुलवामा कनेक्शन, डॉक्टरला अटक

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा आत्मघाती हल्ला असल्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली आय-20 कार पुलवामाचा रहिवासी असलेल्या उमर उन नबी या डॉक्टरची असून त्यानेच स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी उमरचा डॉक्टर मित्र सज्जाद अहमद मल्ला व त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत दुसरा मोठा हल्ला झाल्याने केंद्रीय गृह खात्याचे अपयश ठळकपणे समोर आले आहे. दरम्यान, या स्फोटातील मृतांचा आकडा 13 वर गेला आहे.

दिल्लीतील स्फोटांचा तपास एनआयएने आज अधिकृतपणे हाती घेतला. तत्पूर्वी, दिल्ली व जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत अनेक महत्त्वाचे दुवे हाती लागले आहेत. हल्ल्यातील कार उमर उन नबी याची होती. पुलवामातील कोईल हे उमरचे मूळ गाव आहे. स्फोट झाला तेव्हा उमर ही गाडी चालवत होता. उमर सध्या बेपत्ता आहे. त्याचा स्फोटात मृत्यू झाला असावा अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

केजरीवालांना मोठय़ा कटाचा संशय

दिल्लीत स्फोट नेमका कसा झाला? यामागे एखादे मोठे कटकारस्थान तर नाही ऩा? पोलीस आणि सरकारने तातडीने याची चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

लाल किल्ला तीन दिवस बंद राहणार

स्फोटानंतर दिल्लीत हायअॅलर्ट असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन तात्पुरते बंद करण्यात आले आहे, तर लाल किल्ला पर्यटकांसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत बंद राहील.

मुस्लिम संघटनांची निष्पक्ष चौकशीची मागणी

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमात-ए-इस्लामी हिंद या मुस्लिम संघटनांनी स्पह्टांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हा हल्ला सुरक्षेतील त्रुटींमुळे झाला आहे. सरकारने याची सर्व बाजूने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

भीतीने गांगरून जाऊन घडवला स्फोट

हा स्फोट नेहमीसारखा नव्हता. हल्लेखोरांचा प्लॅन काही वेगळाच होता. त्यांनी कार गर्दीत घुसवली नाही किंवा जास्तीत जास्त जीवितहानी व्हावी असा त्यांचा हेतू दिसत नव्हता. कारमधून स्फोटके घेऊन ते दुसऱ्या ठिकाणी जात असावेत. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने गांगरून जाऊन, घाईगडबडीने त्यांनी स्फोट घडवून आणला, असे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

झाडावर लटकलेला आढळला मृतदेह

स्फोटामुळे अनेक मीटरवरच्या इमारती हादरल्या. स्फोटात मरण पावलेल्या व्यक्तींच्या शरीराचे तुकडे झाले होते. एका व्यक्तीचा मृतदेह झाडावर लटकलेला पोलिसांना आढळला. घटनास्थळी तपास करताना आज सकाळी हा मृतदेह आढळला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

लखनऊमध्ये डॉक्टरच्या घराची झाडाझडती

दिल्ली स्फोटानंतर उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने छापे टाकले. परवेझ अन्सारी या डॉक्टरच्या लखनऊ येथील घराची झडती घेण्यात आली. फरिदाबाद येथून सोमवारी अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मील आणि डॉ. शाहीन शाहीदशी त्याचा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

उमरचे कुटुंबीय म्हणतात,  विश्वासच बसत नाही!

दिल्ली स्फोटातील संशयित हल्लेखोर डॉक्टर उमर नबी याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. त्याची बहीण मुझमिल म्हणाली, ‘लहानपणापासूनच तो अबोल होता. त्याला फारसे मित्रही नव्हते. तो फक्त अभ्यास आणि कामावरच लक्ष द्यायचा. तो असे काही करेल यावर विश्वासच बसत नाही.’

मृतांच्या नातलगांना 10 लाखांची मदत

स्फोटात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या नातलगांना दिल्ली सरकारने 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. कायमचे अपंगत्व आलेल्यांना 5 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज स्पष्ट केले.

मित्रांच्या अटकेनंतर उमरने प्लान आखला!

उमर नबीचे फरिदाबाद येथील टेरर मॉडय़ुलशी कनेक्शन होते. याच टेरर मॉडय़ुलशी संबंधित तीन डॉक्टरांसह अन्य काही जणांना जम्मू-काश्मीर व फरिदाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अमोनियम नायट्रेटसह विविध प्रकारची 2900 किलोची स्फोटके जप्त करण्यात आली. या अटकसत्रानंतर उमरने स्फोटाचा प्लान आखला असावा, असा संशय पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मुंब्य्रात शिक्षकासह दोघांची चौकशी

दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात छापेमारी सुरू असून एटीएसने आज मुंब्रा येथे धाड टाकली. काwसा भागात शिक्षकाच्या घरात झडती घेऊन मोबाईल, कॉम्प्युटर आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. कुर्ला येथील घराचीही झडती घेण्यात आली. हा शिक्षक जमात-ए-इस्लाम या संघटनेशी संबंधित आहे. त्याचे नाव समजू शकलेले नाही. दरम्यान, अन्य एकाचीही कसून चौकशी सुरू आहे.