शेतकरी ठाम, सरकारला घाम! संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, कृषी कायदे मागे घ्या!

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून अन्यायकारक कृषी कायदे आधी मागे घ्या. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. आणखी उग्र आंदोलन करू, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. सात दिवसांनंतरही दिल्लीच्या सीमेवरून हजारो शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत. बळीराजाच्या या निर्धारामुळे कडाक्याच्या थंडीत केंद्रातील मोदी सरकारला घाम फुटला आहे. दरम्यान, आपल्या अन्नदाता बांधवांना पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधील गायक, कलाकार आणि खेळाडू पुढे सरसावले आहेत. ‘पद्मश्री’, ‘अर्जुन’ पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱयांच्या या महत्त्वपूर्ण आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा डाव सुरू असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

मंगळवारी विज्ञान भवनात विविध 35 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर केंद्रीय मंत्र्यांनी तीन तास चर्चा केली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. आता उद्या (दि. 4) पुन्हा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे शेतकरी नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. परंतु यात तोडगा निघण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट झाले आहे.

आंदोलनाला देशभरातून पाठिंबा देण्यात येत आहे. पंजाब, हरियाणातील हजारो शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानपासून तमिळनाडू, कर्नाटकातील शेतकरीही दिल्लीत जात आहेत. त्यामुळे आंदोलनाचा हा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती भवनाबाहेर पुरस्कार ठेवणार

  • आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर लाठीहल्ला केला, पाण्याचे फवारे मारले, याबद्दल पंजाबमधील खेळाडूंनी हरियाणा आणि केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र निषेध केला असून, आपले पुरस्कार परत करणार आहेत. राष्ट्रपती भवनाबाहेर पुरस्कार ठेवणार, असा इशारा खेळाडूंनी दिला आहे.
  • ‘पद्मश्री’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कार विजेते, कुस्तीपटू करतार सिंग, ‘अर्जुन’ पुरस्कार सन्मानित सज्जन सिंग आणि हॉकीपटू राजबीर काैर हे आपले पुरस्कार शनिवारी (दि. 5) राष्ट्रपती भवनाच्या बाहेर ठेवणार आहेत.
  • ‘आम्ही शेतकऱयांची मुले आहोत. शांततापूर्ण आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर बळाचा वापर करण्यात आला. आमच्या पुरस्कारांचे आणि सन्मानाचे काय करणार?’ असा प्रश्न 30हून अधिक खेळाडूंनी विचारला आहे. हे खेळाडू ऑलिम्पिक आणि इतर खेळांत पदकविजेते आहेत. यात गुरमेल सिंग आणि सुरिंदरसिंग सोढी यांचा समावेश आहे. 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या हॉकी संघाने सुवर्णपदक पटकाविले होते. त्यात त्यांचा समावेश होता.

रस्ते अडवू, दिल्लीची पूर्ण नाकाबंदी करू!

  • शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. जोपर्यंत तीन कृषी कायदे सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.
  • कृषी कायदे मागे घेण्यासाठी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे.
  • शेतकऱयांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. राजधानी दिल्लीकडे येणारे सर्व रस्ते रोखण्यात येतील, असा इशारा शेतकरी नेते दर्शन पाल, गुरनाम सिंग, राकेश टिकैत आदींनी दिला आहे.

हरियाणातील कृषीमंत्री म्हणाले, हे लाहोर-कराची नाही

शेतकऱयांच्या आंदोलनावर बेताल बडबड करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये सुरू आहे. गेल्या आठवडय़ात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी असल्याचे म्हटले होते. आज हरियाणाचे कृषिमंत्री जे. पी. दलाल यांनी तारे तोडले. ‘शेतकऱयांनी आंदोलन मागे घ्यावे. दिल्लीचे पाणी तोडण्याचा इशारा देऊ नये. हे काही लाहोर-कराची नाही,’ असे दलाल म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या