मोदी सरकार अर्थव्यवस्थेला क्षमतेप्रमाणे उभारी देण्यात अपयशी!-मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशात रोजगाराची निर्मिती होण्याऐवजी असलेला रोजगारही नष्ट करणारी परिस्थिती चिघळत चालली आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात कर्जबाजारीपणा आणि शहरातील असंतोषामुळे महत्त्वाकांक्षी तरुण वर्ग अस्वस्थ आहे असे सांगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला आज घेरले. अर्थव्यवस्थेला तिच्या क्षमतेप्रमाणे उभारी देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे अशी तोफ त्यांनी डागली.

डॉ. सिंग यांनी दिल्ली इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या दीक्षांत समारंभात बोलताना देशातील भयावह परिस्थितीकडे नव्या पिढीचे लक्ष वेधले.

कृषी क्षेत्रावरील वाढते संकट, रोजगाराच्या संधीमध्ये होणारी घट, पर्यावरणाचा ऱहास आणि विघटनवादी शक्तींच्या घातक कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे देशासमोर भयंकर आव्हाने उभी ठाकली आहेत असे त्यांनी सांगितले.

शेतकऱयांच्या आत्महत्या आणि संतप्त शेतकऱयांच्या वारंवार होणाऱया आंदोलनांमुळे अर्थव्यवस्थेच्या बिघडलेल्या संतुलनाची साक्ष पटते असे सांगून डॉ. सिंग म्हणाले की, देशापुढील समस्यांवर मात करण्यासाठी गंभीर विश्लेषणाची आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज आहे.विनाशकारी नोटाबंदी आणि जीएसटीच्या बेदरकार अंमलबजावणीमुळे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे, असे माजी पंतप्रधानांनी सांगितले.