दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाकालचे दर्शन घेऊन परतणाऱ्या चौघांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण उज्जैनला महाकालचे दर्शन घेऊन नोएडाला परतत होते. पापडदा आणि नांगल राजावतान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलर क्रमांक 193 जवळ हा अपघात घडला. अपघातातील कार हरयाणाची असून या कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते. हा अपघात इतका भयंकर होता की कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, धडक झाल्यानंतर ट्रक चालकाने कारला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार हे सर्वजण हरियाणाचे रहिवासी असल्याचे समजते.