दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानाला पावसाने झोडपले

दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांत शनिवारी अचानक हवामानात बदल झाल्याचे दिसून आले. येथे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस प़डला. तर काही ठिकाणी थंडगार वारे वाहू लागले आहेत. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे येथील नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने यापूर्वीच उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळात आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे तापमानातही घट होण्याची शक्यता नोंदविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही हवामान यंत्रणा अचानक सक्रिय झाल्यामुळे हा बदल दिसून येत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान खात्याने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसआरमध्ये शनिवार आणि रविवारी या दोन्ही दिवशीचे तापमान 33 अंश इतके असणार आहे. या काळात दिल्ली एनसीआरमध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि पावसासोबत 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर-पश्चिम  प्रदेशसह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शनिवार आणि सोमवार दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट, गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांची कापणी लवकर न करण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.