दिल्लीत इंडिया गेटसमोर नक्षल कमांडर हिडमाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; पोलिसांवर ‘चिली स्प्रे’ने हल्ला, 23 जणांना अटक

रविवारी सायंकाळी दिल्लीतील इंडिया गेटजवळ वायू प्रदूषणाविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात घुसलेल्या काही लोकांनी कुख्यात नक्षली हिडमा माडवी याचे पोस्टर झळकावत त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसेच पोलिसांवर ‘चिली स्प्रे’ने हल्ला करण्यात आला होता. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत 23 जणाना अटक केली असून त्यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे.

छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवरील दंडकारण्यावर एकेकाळी ज्याने राज्य केले आणि 500 पेक्षा जास्त जवानांचा बळी घेतला असा जहाल नक्षलवादी हिडमा माडवी याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते. मंगळवारी पहाटे सीमेजवळ झालेल्या कारवाईमध्ये हिडमा, त्याची पत्नी आणि अन्य चार नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हिडमावर 10 कोटींपेक्षा जास्त बक्षीस ठेवले होते. तो किमान 25 हल्ल्यांचा सूत्रधार होता. आता त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याने खळबळ उडाली.

वायू प्रदूषणाविरुद्ध आंदोलन करण्यासाठी इंडिया गेटजवळ पोहोचलेल्या आंदोलकांच्या हातामध्ये कुख्यात नक्षल कमांडर हिडमा याचे पोस्टर होते. यावेळी एका गटाने माडवी हिडमा अमर रहे अशा घोषणाबाजी केली.

पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यावर आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडले आणि रस्त्यावर येऊन बसले. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर ‘चिली स्प्रे’चा हल्ला केला. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहरा आणि डोळ्यांना दुखापत झाली. त्यांना तात्काळ आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.