दिल्लीत होणार नवीन संसद भवन, राजपथ; अहमदाबादची कंपनी करणार निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्ली येथील देशाचे नवीन संसद भवन तयार करण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील कंपनीला हे कंत्राट मिळालं असून लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या या प्रकल्पाअंतर्गत एक नवीन संसद भवन निर्माण करण्यात येणार आहे. त्याखेरीज राजपथाची दुरुस्ती करण्यात येणार असून नवीन सचिवालयही तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा असून 2024च्या मार्च महिन्यापर्यंत पूरा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्या निविदांमधून अहमदाबाद येथील एका कंपनीची निविदा निवडण्यात आली आहे.

एचसीपी असं या कंपनीचं नाव असून कंपनीने यापूर्वी भाजप मुख्यालयाच्या बांधकामाचं काही काम केलं आहे. या प्रकल्पादरम्यान एचसीपी आराखडे तयार करणे, आराखड्यांनुसार कामाचं नियोजन, प्रत्यक्ष बांधकामासाठी लागणाऱ्या जागेची तपासणी, नवीन आराखड्यानुसार वाहतुकीचं नियोजन, तसेच अत्याधुनिक सोयीसुविधा या सर्वांवर काम करणार आहे. केंद्रिय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीची ओळख असलेले नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि संसद भवनाची इमारत, त्यांच्याशी निगडीत इतिहास तसाच अबाधित राहणार आहेत. फक्त या इमारतींचा वापर बदलेल, अशी माहिती पुरी यांनी दिली आहे.