
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
फॅनी चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय आणि पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्यात वेगळ्याच मुद्दय़ावर आता तू तू मै मै सुरू झाले आहे. ममता बॅनर्जी यांनी मोदींवर आरोप केला होता की, चक्रीवादळ आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याऐवजी केवळ राज्यपालांशीच बोलले आहेत. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण केले की, चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याशी दोनवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकदा त्या दौऱयावर गेल्याचे सांगण्यात आले तर दुसऱयांदा परतल्यानंतर संपर्क करण्यात येईल असे उत्तर देण्यात आले.
पीएमओने म्हटले आहे की, शनिवारी सकाळी पीएमओकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोनवरून संपर्क करण्याचा दोनदा प्रयत्न करण्यात आला. पहिल्यांदा पीएमओला सांगण्यात आले की, मुख्यमंत्री सध्या दौऱयाकर आहेत. त्या परतल्यानंतर तुम्हाला फोन करण्यात येईल. त्यानंतर दुसऱयांदा फोन केल्यानंतरही पुन्हा पंतप्रधान कार्यालयाला मुख्यमंत्री आल्यानंतर फोन करण्यात येईल असे सांगण्यात आले. चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की, तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे. कारण, मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क न करता केवळ राज्यपालांशीच इथल्या स्थितीबाबत चर्चा केली. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याचे पीएमओने म्हटले आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चांगलेच वाक् युद्ध रंगताना दिसते आहे. दोन्ही नेते निवडणूक सभांमध्ये एकमेकांवर निशाणा साधण्यापासून मागे हटत नाहीत.

























































