
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनीच राजधानीत बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे आणि गॅस पाइपलाइनवर दहशतवादी हल्ला करण्याचा भयंकर कट दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला. ‘जैश-ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्या दोघांची नावे अब्दुल लतिफ गनी ऊर्फ दिलावर आणि हिलाल अशी आहेत.
श्रीनगरमधील ताज्या बॉम्बहल्ल्याच्या मालिकेचा सूत्रधार अब्दुल लतिफ गनी हा प्रजासत्ताक दिनी वर्दळीच्या ठिकाणी तसाच हल्ला चढवण्यासाठी तयारी करत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. लतिफने दिलेल्या माहितीनंतर जम्मू-कश्मीरमधून दोन आईडी आणि ग्रेनेडस् जप्त केले. तसेच दिल्लीत प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्यासाठी ‘जैश’ने निवडलेल्या ठिकाणांची ‘रेकी’ करणाऱया हिलालला बंदिपुरात बेडय़ा ठोकल्या.
- लजपत नगर, पूर्व दिल्लीतील गॅस पाइपलाइन, गर्दीच्या काही ठिकाणी घातपाती कारवाया करण्याचा कट त्या दोघा दहशतवाद्यांनी रचला होता. त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या नियोजित ठिकाणांची पाहणीही केली होती.
- ‘मोठा हाहाकार उडवून देणारे असे काही तरी घडवले पाहिजे की त्यानंतर अख्खा हिंदुस्थान रडला पाहिजे’ असा संवाद सुरक्षा यंत्रणांनी ‘टॅप’ केला होता. त्यावरून सुरक्षा यंत्रणांनी ‘जैश’च्या दोघा दहशतवाद्यांना पकडले.
दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळय़ासाठी कडक बंदोबस्त
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा दिल्लीत होणार आहे. राजपथ ते लाल किल्ल्याच्या मार्गावर ‘रिपब्लिक डे परेड’ हे या सोहळय़ाचे मुख्य आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत, मध्य दिल्लीत महत्त्वाच्या ठिकाणी 25 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय विमानविरोधी तोफा, महिला कमांडोज, पराक्रम व्हॅन गस्तीसाठी परेडच्या मार्गावर राहतील. सीसीटीव्ही कॅमऱयाबरोबरच चेहरे ओळखणारे कॅमेरे बसवले आहेत. तसेच ड्रोन्सना लगाम घालण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे.
























































