दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी पवई आयआयटीचा ‘स्मॉग टॉवर’

301

दिल्लीमधील हवा प्रदूषित झाली आहे. त्याचा त्रास दिल्लीकरांना जाणवू लागला आहे. दिल्ली सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन हे प्रदूषण रोखण्यासाठी पवई येथील आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांचे सहकार्य मागितले आहे. आयआयटी मुंबईच्या सहकार्याने दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागात प्रदूषण नियंत्रणासाठी ‘स्मॉग टॉवर’ उभारला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश गेल्या नोव्हेंबरमध्ये दिले होते. त्यावर उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने डिसेंबरमध्ये आपला अहवाल सादर केला. हवेच्या शुद्धीकरणासाठी कॅनॉट प्लेस भागात 20 मीटर उंचीचा स्मॉग टॉवर उभारण्याची शिफारस समितीने केली होती. तीन महिन्यांत तो टॉवर उभारला जावा, असे निर्देश न्यायालयाने त्यावर दिल्ली सरकारला दिले होते. आनंद विहार भागातही स्मॉग टॉवर उभारण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. न्यायालयाच्या निर्देशावर दिल्ली सरकारने आयआयटी मुंबईच्या सेंटर फॉर सायन्स ऍण्ड एन्व्हायरनमेंटल इंजिनीयरिंग विभागाला पत्र पाठवले आहे.
700 मीटर क्षेत्रातील 65 टक्के प्रदूषण कमी करण्यास मदत

स्मॉग टॉवर उभारला गेल्यास त्याच्या 700 मीटर परिसरातील प्रदूषण 65 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकेल. त्याचप्रमाणे एक किलोमीटरपर्यंतच्या हवेचा दर्जा उंचावला जाऊ शकेल, असे समितीने न्यायालयाला सांगितले होते. स्मॉग टॉवरमुळे हवेचा दर्जा मात्र मोठय़ा प्रमाणात सुधारला जाणार नाही, असेही समितीने अहवालात स्पष्ट केले होते. हा टॉवर उभारण्यासाठी सुमारे 12 कोटी ते 15 कोटी रुपये खर्च येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या