
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
वायुदल प्रमुख बी.एस. धनोआ यांच्या निवासस्थानाबाहेर ‘राफेल’ विमानाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. धनोआ यांचे घर राजधानी दिल्लीत ‘24, अकबर रोड’ येथील काँग्रेस मुख्यालयाच्या समोर आहे. याआधी धनोआ यांच्या घराबाहेर सुखोई विमानाची प्रतिकृती होती; पण काही महिन्यांपूर्वी ती हटविण्यात आली. ‘राफेल’ विमानांचा सौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स सरकारसोबत केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारवर राफेल घोटाळ्याचेच आरोप केले होते.
राफेलचे पहिले विमान लवकरच हिंदुस्थानी वायुदलाच्या ‘गोल्डन ऍरो’ 17 स्क्वार्ड्रन या युनिटमध्ये सामील होणार आहे. या युनिटचे नेतृत्व 1999च्या कारगिल युद्धात एअरचीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनीच केले होते. आधी हे युनिट पंजाबमधील भटिंडा येथे होते. आता ते हरयाणाच्या अंबाला येथे हलविण्यात आले आहे. राफेलची पहिली खेप वायुदलाला येत्या सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. यात चार विमाने असतील. तत्पूर्वी या विमानांना हिंदुस्थानच्या वातावरणात 1500 तासांचे उड्डाण घ्यावे लागणार आहे. त्यामुळे या चार राफेल विमानांची पहिली खेप अंबाला येथे येईपर्यंत मे 2020 साल उजाडू शकते.























































