
राजधानी दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खालीद याला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने खालीदची 11 तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली.
दिल्ली दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2 सप्टेंबरला काही तास उमर खालीदची चौकशी केली होती. त्याआधी पोलिसांनी दंगलीशी संबंधित अन्य एका प्रकरणात उमर याच्याविरोधात ‘यूएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कट रचल्याप्रकरणी उमर याची चौकशी केली होती. उमर हा 2016मध्ये ‘जेएनयू’मध्ये झालेल्या कथित राष्ट्रविरोधी घोषणाबाजीप्रकरणी प्रकाशझोतात आला होता. त्या प्रकरणातही त्याला अटक केली होती. कन्हैया कुमार याच्यासह देशद्रोहाच्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये त्याच्या नावाचा समावेश आहे. ‘सीएए’विरोधक आणि समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर 24 फेब्रुवारी रोजी दिल्लीत दंगल भडकली होती. त्यात 53 जणांचा मृत्यू तर 200 जण जखमी झाले होते.

























































