गर्लफ्रेंड समजून केलं चॅट आणि गेला आत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोपीला पकडण्यासाठी किंवा त्याच्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना अनेक शकला लढवाव्या लागतात. अशीच एक शक्कल लढवून दिल्ली पोलिसांनी एका लुटारुला पकडलं आहे. गर्लफ्रेंड समजून तो महिला पोलिसासोबत चॅटींग करायचा. त्याच चॅटमधून पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले आणि त्याची रवानगी आत करण्यात आली आहे.

दिल्लीतील मुंडका भागात लुटारुंनी उच्छाद मांडला होता. लुटारुंच्या या टोळक्याने काही दिवसांपूर्वी या भागात एक कार लुटली होती. या गुन्ह्यचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती एका लुटारुची कॉल डिटेल लागली. त्यावरून पोलीस त्याच्या गर्लफ्रेंडपर्यंत पोहचले. त्यानंतर तिच्या मोबाईलवरुन एका महिला पोलिसाला चॅटींग करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे आरोपीला वाटले की तो गर्लफ्रेंडबरोबरच बोलत आहे. त्यानंतर महिला पोलिसाने त्याच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. गर्लफ्रेंडने भेटण्यास बोलावल्याने आरोपीने लगेच होकार दिला. नंतर तिने त्याला भेटण्याचे ठिकाण सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला व आरोपीच्या मुसक्या आवळल्या.