दिल्ली हिंसाचाराच्या सूत्रधारासह 21 जणांना अटक, 30 संशयित ताब्यात; 10 पोलीस पथकांमार्फत तपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जहांगीरपुरी येथील हनुमान जन्मोत्सवावेळी झालेल्या हिंसाचाराचा 10 पोलीस पथकांमार्फत कसून तपास सुरू करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ फुटेजच्या आधारे ओळख पटवत हिंसाचाराच्या सूत्रधारासह 21 जणांना अटक केली आहे. तसेच जवळपास 30 संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा हिंसाचाराच्या तपासाची चव्रे फिरवून आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

हल्लेखोरांनी दगडफेकीसह गाडय़ांची जाळपोळ आणि गोळीबारही केला. जमावातील एकाने सात ते आठ गोळय़ा झाडल्या. त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला गोळी लागली आहे. हिंसाचारात जखमी झालेल्या 9 जणांमध्ये 8 पोलीस कर्मचारी आहेत. सर्वप्रथम मशिदीच्या छतावरुन दगडफेक सुरू केली गेली. दगडफेक आणि गोळीबार करून दंगल भडकावण्याचा प्रयत्न केला गेला. मुस्लिम लोकांनी घरांच्या छतावरून दगडफेक केली, असा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी शेकडो व्हिडीओ फुटेजच्या मदतीने तपासाला गती दिली आहे. याप्रकरणी 21 जणांना अटक केली असून त्यात हिंसाचाराचा सूत्रधार अन्सार (35) याच्यासह गोळीबार करणाऱया दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दगडफेक करण्यासाठी लहान मुलांचाही वापर केला गेला. पोलिसांनी हल्लेखोरांकडील तीन बंदुका आणि पाच तलवारी जप्त केल्या आहेत.