
कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यामुळे दिल्लीबरोबरच तामीळनाडूनेही पुन्हा मास्कसक्ती लागू केली आहे. दोन्ही राज्यांत सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱया नागरिकांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
या राज्यांनी तीन आठवडय़ांपूर्वीच मास्कचे बंधन उठवले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असेल. हा नियम मोडणाऱयांकडून पोलीस व आरोग्य कर्मचारी 500 रुपयांचा दंड वसूल करतील, असे तामीळनाडूचे मुख्य आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी जाहीर केले. दिल्लीत बुधवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत शुक्रवारी केजरीवाल सरकारने अधिकृत आदेश जारी केला.

























































