यूआयडीएआयचे नियम, नावात दोन वेळा, जन्मतारखेत एकदाच बदल करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूआयडीएआय अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नाव, लिंग आणि जन्मतारीख बदलण्यासाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. आधारकार्डावर कुणीही नाव, जन्मतारीख आणि लिंग याबाबतची माहिती अपडेट करू शकते, परंतु त्यासाठी यूआयडीएआयने मर्यादा आणल्या आहेत. त्यानुसार नावात दोनवेळा तर जन्मतारखेत केवळ एकदाच बदल करता येणार आहे.

यूआयडीएआयने याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. जन्मतारीख बदलण्यासाठीचेही नियम कडक करण्यात आले आहेत. आधारकार्ड तयार करताना जी जन्मतारीख नोंदवण्यात आलेली असेल त्यात कुणाला बदल करायचा असेल तर तीन वर्षे कमी किंवा अधिकच्या तारखेपर्यंतचा आकडा टाकण्याचीच मुभा असेल. परंतु त्यासाठी जन्मतारखेचा पुरावा सादर करणे अनिवार्य असेल. जन्मतारखेचा अधिकृत पुरावाच ग्राह्य धरला जाईल. केवळ एकदाच जन्मतारीख बदलण्याची मुभा असेल, असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

बदल करण्यासाठी योग्य कारण द्यावे लागणार

आधारकार्डवर जेंडरमध्येही एकदाच बदल करण्याची मुभा असेल. नाव, लिंग आणि जन्मतारखेत बदल करण्यासाठी संबंधितांना आपल्या परिसरातील यूआयडीएआयच्या कार्यालयात जावे लागेल. दरम्यान, आपण आधारकार्डावर नाव, लिंग आणि जन्मतारखेत बदल का करतोय याबाबतचे योग्य कारणही द्यावे लागणार आहे.