Delhi Violence – अभिनंदनच्या जबरा फॅनचा मृत्यू, मुलांना दिलेले वचन राहिले अपूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्लीमध्ये नागरिकता सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC) विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक रुप धारण केले. या हिंसाचारामध्ये हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रतन लाल यांच्या मृत्यूची बातमी कळतात त्यांच्या घरात शोककळा पसरली आहे. तसेच रतन लाल यांच्या मृत्यूमुळे दिल्ली पोलिसांनी आणि त्यांच्या साथिदारांनाही दु:ख व्यक्त केले आहे.

दिल्ली हिंसाचार – गौतम गंभीर आक्रमक, दंगल भडकावणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी

नागरिकता सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या हिंसाचाराने सोमवारी उत्तर-पूर्व दिल्ली भागात उग्र रूप धारण केले. सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. यात हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचाही समावेश आहे. रतन लाल हे पाकिस्तानमध्ये जाऊन जांबाज कामगिरी करणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे फॅन होते आणि त्यांच्यासारख्या मिशा ठेवण्याची त्यांना आवड होती, असे त्यांच्या जवळच्यांनी सांगितले.

ratan-lal-new

गेल्या वर्षी हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडल्यानंतर त्यांचे विमानही कोसळले आणि ते पाकिस्तानच्या हाती लागले. परंतु हिंदुस्थानच्या मुत्सद्दीगिरीपुढे पाकिस्तानला हार मानावी लागली आणि तीनच दिवसात त्यांची सुटका झाली. तेव्हापासून अभिनंदन यांच्या मिशाचे फॅड वाढले.

ratan-lal-new1

विंग कमांडर अभिनंदन यांच्या जांबाज कामगिरीनंतर हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांनीही त्यांच्यासारख्या मिशा ठेवल्या होत्या. व्यक्तीमत्व भारदस्त करणाऱ्या या मिशांमुळे ते दिल्ली पोलिसांमध्ये लोकप्रिय होते. तसेच रतन लाल हे आपल्या मुलांनाही विंग कमांडर यांच्यासारखे बहादूर बनण्यास सांगत होते. आता बरोबर एका वर्षांनी रतन लाल यांना दिल्लीतील झुंडीचा सामना करताना विरमरण आले.

ratn-lal

रतन लाल हे 1998 मध्ये दिल्ली पोलीसमध्ये भरती झाले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. गोकुलपुरीमध्ये ते हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. गोकुलपुरीमध्ये गेल्याकाही वर्षात दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या छापेमारीचे नेतृत्व त्यांनी केले होते. रतन लाल हे मूळचे राजस्थानचे असून त्यांनी यंदाची होळी आपल्या मूळ गावी साजरी करण्याचे वचन मुलांना दिले होते. मात्र त्यांचे वचन अपूर्णच राहिले.