#Delhi voilence मृतांचा आकडा वाढला

754

नागरिकत्व सुधारित कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी विरोधात दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात 30, एलएनजेपी रुग्णालयात 2 व जेपीसी रुग्णालयात एकाचा मृत्यूचा झाल्याचे समजते.

ईशान्य दिल्लीमध्ये भडकलेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्यासह 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 150 सामान्य नागरिक आणि 56 पोलीसही जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हिंसाचार रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठे पाऊल उचलले असून ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक करत हैदोस घातल्याने ईशान्य दिल्लीमध्ये एक महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले. तसेच चार ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयपीएस एस.एन. श्रीवास्तव यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिल्लीत लष्कर बोलवा – केजरीवाल 

नागरिकत्व सुधारित कायद्यावरून (सीएए) उसळलेल्या आगडोंबामुळे दिल्लीतील परिस्थिती फारच स्फोटक आणि गंभीर आहे. दिल्ली पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकत नाही. पोलिसांचे प्रयत्न कमी पडत आहेत. त्यामुळे तातडीने लष्कराला पाचारण करावे अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. याबाबत आपण गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

अमित शहा कुठे गायब होते? गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या – सोनिया गांधी
दिल्लीतील हिंसाचारास केंद्र सरकार दिल्ली सरकार जबाबदार आहे. हिंसाचार भडकल्यानंतर 72 तासांत केंद्र सरकारने हिंसाचार रोखण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. दिल्लीतील दंगल ही पूर्वनियोजित होती. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. रविवारपासून अमित शहा कुठे गायब होते, काय करत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज काँगेस कार्यसमितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दंगलग्रस्त भागात शांती मार्च काढून दिल्लीकरांना शांततेचे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या