मालवण-कणकवली मार्गावर कॉलेज वेळेत बसफेरी सुरू करा!

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण आगारातून सकाळी ७ वाजता सुटणारी मालवण-सोलापूर ही सोलापूर आगाराची बस नियमित नसल्याने कट्टा, सुकळवाड, कसाल व कणकवली येथे कॉलेज व महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अनेक समस्या निर्माण होत आहेत. विद्यार्थी वर्गाचे होणारे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सकाळी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कणकवली मार्गावरून नवी बसफेरी सुरू करावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक यतीन खोत यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मालवण आगार प्रशासनाकडे केली आहे.

मालवण तालुक्यातील २० ते २५ विद्यार्थी व काही शिक्षकांनाही बस फेरी वेळेत नसल्याने कॉलेजमध्ये वेळेत पोहचण्यास अडचणी येतात. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काहीवेळा खाजगी गाडीने प्रवास करावा लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तरी या विद्यार्थी वर्गाला जी वेळ सोयीस्कर असेल त्याचा सकारात्मक विचार करून मुलांची गैरसोय टाळावी, अशी मागणीही खोत यांनी आगार प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्यासह कोमल जुवाटकर, कल्याणी राणे, हृतिका चव्हाण, श्रद्धा मालवणकर, शमिका लाड, अक्षाता गावकर, अस्मिता राऊत, सुश्रुत परब, चैतन्य मिठबावकर, अवधूत आंबेरकर, सुरज करंगुटकर, शुभम माणगावकर, दर्शन रासम, अरविंद हडकर व अन्य विद्यार्थी वर्गाने नियमित बसफेरी सुरू करण्याची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या