
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मजूर असल्याचे भासवून मुंबई बँकेचे संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच आपल्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. तसेच बोगस कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले आहे. दरेकर आणि त्यांच्या टीमच्या या कारनाम्यांची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करून त्यांना अटक करण्याची मागणी आज आम आदमी पक्षाने केली आहे.
मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरेकरांनी आपण रंगारी मजूर असल्याचे दाखवत 20 वर्षे मजूर गटातून मुंबई बँकेवर प्रतिनिधित्व केले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने या गैरव्यवहाराची आणि बोगसगिरीची स्वतः दखल घेत स्युमोटो याचिका दाखल करून घेऊन एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, भाजप वाढवण्यासाठी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंह या घोटाळेबाजांना पक्षात प्रवेश दिला असल्याचा आरोप मेनन यांनी केला.
अटकेपासून तुर्तास संरक्षण
मजूर असल्याचे भासवून मुंबई बँकेच्या संचालकपदी निवडून येणारे प्रवीण दरेकर यांना अटकेपासून दिलेले संरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडय़ांपर्यंत कायम ठेवले आहे. दरेकर यांच्यावर कारवाई करू नये, असे आदेश न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी पोलिसांना दिले आहेत. दरेकर यांनी आपल्याला अटक होऊ नये म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

























































