
आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि आरएसएसवाले कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुमच्याजवळ असणाऱया 500 रुपयांच्या नोटा या आताच 200 आणि 100च्या करून घ्या. मी चेष्टा करीत नाही. गांभीर्याने बोलतोय. कारण निवडणुका आल्या की, मोदी एक नोट बदलतात. याआधी गुलाबी नोट बदलली. आता ते पाचशेची नोट बदलतील, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर बुधवारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धम्म मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आपल्या भाषणात त्यांनी भाजप, आरएसएस, मोदी, शाह यांच्यावर घणाघाती टीका करत भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. गेल्या नऊ वर्षांत मोदींचे अर्थशास्त्र फेल गेले आहे. देशाचा पैसा मोदी उडवत आहेत. जसा बापाचा पैसा उनाड पोरगा उडवतो त्याप्रमाणे मोदी वागत आहेत, अशा शेलक्या शब्दांत आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली. देशात सध्या वाईट काळ सुरू आहे. आगामी काळात भाजप, आरएसएस यांचा डाव ओळखून त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता सत्तेतून खाली खेचण्याचे काम करावे. हिंदू, मुस्लीम सर्वच जातींनी ही जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही आंबेडकर यांनी या वेळी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी मोदी पुन्हा नोटबंदी करतील. आधी गुलाबी नोट बदलली, आता पाचशेची नोट बदलून आपल्या सर्वांना नोटा बदलायला दोन महिन्यांचा वेळ देऊन रांगेत उभे करतील. त्यामुळे वेळीच सावध व्हा. सत्तेत येण्यासाठी भाजपने पक्ष फोडले. भ्रष्टाचाराचे आरोप करून जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवत अनेकांना भाजपमध्ये घेतले. मोदी हे जगाचे नेते आहेत हे दाखवण्यासाठी 1 लाख 13 हजार कोटी रुपये खर्च केले. पैशांची उधळपट्टी करूनही मोदींची जी फजिती व्हायची ती झालीच आहे, असा टोला आंबेडकरांनी लगावला. मोदी यांना इंग्रजी येत नाही हे संपूर्ण जगाने पाहिल्याने हिंदुस्थानची इज्जत गेली आहे. न खाऊंगा, न खाने दुंगा असं म्हणतात, पण मोदी एकटेच खात सुटले आहेत, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, अशोक सोनावणे, नीलेश विश्वकर्मा, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर आदी उपस्थित होते.

























































