कोल्हापुरात डेंग्यू, स्वाइन फ्लूची धास्ती; डेंग्यूने दोघांचा, तर स्वाइन फ्लूने चौघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे कमी-जास्त प्रमाणात आढळणारे रुग्ण आणि मंकीपॉक्सची धास्ती असतानाच जिह्यात डेंग्यूसह स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढू लागला आहे. गेल्या एक-दोन आठवडय़ांत डेंग्यूने दोघांचा बळी गेला असताना, आता चौघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला एक रुग्ण रत्नागिरी येथील असून, आणखी 33 रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. खबरदारीसाठी जिह्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

कोरोना संसर्गाच्या सध्या चौथ्या लाटेत एकीकडे जिह्यात रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे. तर, आता मंकीपॉक्सने जगभर चिंता वाढवल्याने येथेही धास्ती निर्माण झाली असून, जिह्यात साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. त्यात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असून, दोघांचा बळी गेल्याची घटनाही ताजी आहे. जिह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत 33 जणांना स्वाइन फ्लू झाला असून, यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला एकजण रत्नागिरी येथील आहे. 20 हून अधिक रुग्णांवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयासह विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 51 ते 60 वयोगटांतील रुग्णांची संख्या अधिक आहे. कोल्हापूर शहर आणि अन्य जिह्यांतील प्रत्येकी आठ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. नऊजणांची तब्येत बरी झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

नागरिकांनी घाबरू नये – आरोग्याधिकारी डॉ. साळे
सध्या जिह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत असल्याने, कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. उपचारासाठी आवश्यक टॉमी फ्लूच्या गोळ्यांचा औषधसाठा सर्व शासकीय रुग्णालयांत उपलब्ध असून, घाबरून न जाता नागरिकांनी येथे उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले.