
वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेचा हिस्सा नाकारल्याप्रकरणी हायकोर्टात धाव घेणाऱ्या विवाहितेला हायकोर्टाने दिलासा दिला. 1994 च्या घटना दुरुस्तीने मुलींना मालमत्तेत समान हक्क प्रदान केले आहेत. इतकेच नव्हे तर वारसा हक्क कायद्यानुसार विवाहानंतरही मुलगी तिच्या वडिलांच्या मालमत्तेची वारसदार असते असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला.
कालिंदीबाई शिरसाट यांच्या वडिलांच्या निधनानंतर सातबारावर मुलगी कालिंदीबाई यांच्यासह आई व अन्य एकाचे नाव चढवण्यात आले. चौपदरीकरणात त्या जागेच्या बदल्यात सरकारने नुकसानभरपाई म्हणून 8 कोटी 58 हजार देण्याचे जाहीर केले, मात्र कालिंदीबाई यांचा विवाह झाल्याने त्यांना हिस्सा नाकारण्यात आला, तर सोलापूर जिल्हा न्यायालयाने कालिंदीबाई व त्यांच्या आईऐवजी अन्य भागदारास हा संपूर्ण मोबदला देण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात कालिंदीबाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली.