
देवगड येथील जामसंडे बाजारपेठेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बाजारपेठ शुक्रवारपासून सात दिवस बंद ठेवण्याचा स्वयंघोषित निर्णय जामसंडे बाजारपेठेतील व्यापारी संघटनेने घेतला आहे.
शुक्रवारी बाजारपेठेमध्ये पूर्णतः शुकशुकाट दिसत होता. परिसरात येणाऱ्या बँकेमध्ये एक खिडकी योजना सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली जात होती. तसेच बाजारपेठेत येणारे मेडिकल दुकान देखील बंद ठेवण्यात आले आहे. स्वयंघोषित बंदला बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या नेतृत्वाखाली ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसत होता नगरपंचायत प्रशासनाकडून मुख्य रस्त्यावर तसेच ज्या ठिकाणी रुग्ण सापडले ते ठिकाण सॅनिटाईझ करण्याचे काम सुरू आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी घरी थांबा आणि कोरोनाला हरवा असाच एक प्रकारचा संदेश स्वयंघोषित बंद पुकारल्यामुळे जनतेला देण्यात आला. स्वयंघोषित बंदला पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.



























































