
पालिकेच्या देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये वीजनिर्मिती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पालिकेला तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या कामासाठी कंत्राटदार मिळाला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबईभरातून दररोज येणाऱया 600 मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया केली जाणार आहे.
पालिकेचे देवनार डंपिंग ग्राऊंड महत्त्वाचे डंपिंग ग्राऊंड असून 1927 मध्ये सुरू करण्यात आले होते. सुमारे 12 हेक्टर जागेवर देवनार डंपिंग ग्राऊंड विस्तारलेले आहे. या ठिकाणी कचऱयापासून वीजनिर्मिती करण्याची योजना 2014 मध्ये आखण्यात आली, मात्र या उपक्रमासाठी कंत्राटदार मिळाला नव्हता. मात्र आता पालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. यानुसार कंत्राटदाराला या जागेवर 40 महिन्यांत प्रकल्प सुरू करून कचऱयापासून वीजनिर्मिती सुरू करावी लागणार आहे. कंत्राटदाराला पुढील 15 वर्षांसाठी जमीन दिली जाणार आहे. या डंपिंग ग्राऊंडवर वर्षाला 17 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती केली जाणार आहे. ही वीज पालिकेच्या कार्यालयात वापरली जाणार आहे.
- देवनार डंपिंग ग्राऊंड वीज प्रकल्पासाठी पालिकेने आधी दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याची अट घातली होती. मात्र याला एकाही निविदाकाराने प्रतिसाद दिला नसल्याने 2018 मध्ये ही मर्यादा दररोज 600 मेट्रिक टनांपर्यंत खाली आणण्यात आली. त्यामुळेच वीजनिर्मिती प्रकल्पाला निविदाकार मिळाला असून लवकरच याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.


























































