देवनार डंपिंग ग्राऊंड वापरण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ द्या! हायकोर्टात पालिकेचा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मुलुंड, कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आली असून कचरा जमा करण्यासाठी देवनार डंपिंग ग्राऊंड उपलब्ध आहे. मात्र हे डंपिंग ग्राऊंड वापरण्याची मुदतही संपत आली असून किमान आणखी दोन वर्षे ही मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आज पालिका प्रशासनाच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली.

मुंबईतील डंपिंग ग्राऊंडच्या समस्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, मुंबईतील डंपिंग ग्राऊंडची जागा अपुरी पडत असल्याने अंबरनाथ येथील करवले गावातील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय मॉल, विविध सोसायटय़ांमध्येही कचरा विघटनासाठी प्रकल्प राबवण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत पालिका प्रशासनाला यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले व सुनावणी 18 जानेवारीपर्यंत तहकूब केली.