
>> प्रा. बाळासाहेब बोरसे
कवी विश्वनाथ ससे यांचा ‘वास्तव भेदाक्षरी’ हा पाचवा कवितासंग्रह. स्वरूप प्रकाशनानाचा हा संग्रह लक्ष वेधून घेतो. कवितासंग्रहाच्या शीर्षकाप्रमाणेच शब्दाशब्दांतून, अक्षराअक्षरांतून वास्तवाचा भेद करणारा, म्हणूनच भेदक वास्तव सहजपणे अनुभवास आणून देणारा. कवीच्या जीवनानुभवाला अनुसरून कोणताही कवी कवितेतून भाष्य करीत जातो. ‘खंताक्षरी’ या पहिल्याच कवितेतून कवीने त्याचे अस्वस्थ अंतरंग प्रभावीपणे शब्दांकित केले आहे-
वास्तवा आरपार
खंताक्षरे सापडली
शोधबोध घेताघेता
अंतरी जी साठवली!
हेच कवीचे मनोगत पुढील अनेक कवितांतून पारदर्शी रीतीने मुखरित झाले आहे. ‘वाटेकरी’, ‘मग आधीचे कोण?’, ‘समाजरथ’ यांसारख्या कवितांतून त्याची आपणास प्रचीती येते. ‘माणसाचा डंख’ या कवितेत कवीने एक फार मोठे वास्तव सत्य सांगितले आहे.
‘युगामागे युग’, ‘कालकालांतरी संसर्ग’, ‘विवेकी जागर’, ‘पैसा हाच घोटाळा’ या कवितांतून आजच्या वर्तमानापर्यंत येऊन पोहोचलेली भ्रष्ट परंपरा, माणुसकीचे दुभंगलेपण, संवेदनक्षमतेचा कडेलोट, पैशाचे अवाजवी महत्त्व यावर नेमकेपणानं बोट ठेवत कवी मर्मघाती टीका-टिप्पणी करतो. कधी भोवतालचे असहय़ वर्तमान पाहून कवीला हे अंतर शल्य पुढीलप्रमाणे व्यक्त करावेसे वाटते-
निराशेच्या काठावर अंतरमन एकटे
आशेची पायवाट, शोधणार कुठे?
‘मनाचे कंगोरे’, ‘वळणवाटा’, ‘उपरती’, ‘कविता जगण्यातली’ अशा काही कविता कवीचे जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडून जातात. विश्वनाथ ससे यांचे चित्रकारी कवीमन ‘रंगकला’ आणि ‘आविष्कार’ तसेच ‘लहरी पाऊस’, ‘रानझळा’, ‘पर्यावरण’, ‘जीव वसुंधरेचा’, ‘रंगसृष्टी’ या कवितांतून निसर्गाशी अक्षय नाते शब्दांकित झालेले दिसून येते.
एकूणच कवीच्या कवितेतील उपमा, प्रतिमा, यमक, अनुप्रास, श्लेष, रूपक आणि नवे शब्द घडविण्याची त्याची आवड, चित्रमय ओढ यांचा स्वतंत्र विचार करावा इतकी त्यात प्रगल्भता आणि अर्थपूर्णता आली आहे. त्यासाठी कवीच्या प्रतिभेस आणि त्याच्या कल्पनाशक्तीस विशेष दाद द्यावी लागेल. कवीच्या कवितेत जी चित्रमयता येते ती त्याच्यातील चित्रकाराच्या नजरेचीच काव्यमय परिणती म्हणावी लागेल. या कवितासंग्रहातील कविता एकदा वाचूनही समजतात पण पुनःपुन्हा वाचून त्या अधिकाधिक समजतात, मग आपल्याला पुन्हा कवीच्या त्या शब्दाशब्दांतून, ओळीओळींतून त्यामागील दडलेले कितीतरी अर्थ पुन्हा उमगू लागतात.
विश्वनाथ ससे यांच्या कवितेचे या कवितासंग्रहातून सामाजिक आविष्काराकडे वळणे खूपच आशादायी आहे. त्यांच्यातील प्रतिभावंताला अभिव्यक्तीचे नवे भावबळ द्यायलाही हा संग्रह प्रेरणादायी ठरणार आहे, यात शंका नाही.
वास्तव भेदाक्षरी
कवी – विश्वनाथ ससे
प्रकाशक – स्वरूप प्रकाशन, संभाजीनगर
पृष्ठ – 110, मूल्य – रुपये 125/-





























































