
मुंबई वगळता इतर सर्व पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे महायुतीतील घटक पक्षांची पळापळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट दिल्लीत धाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात सूर लावल्याचे सूत्रांकडून समजते.
दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना फडणवीसांनी स्वबळाचे भाष्य केले होते. त्यामुळे शिंदे व अजित पवारांचे धाबे दणाणल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केवळ सत्ता असल्यामुळे कार्यकर्ते शिंदे व अजित पवारांसोबत आहेत. स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर यश मिळवल्यास या दोघांच्या पक्षात फूट पडेल, अशी भीती त्यांना आहे. त्याचे प्रत्यंतर सोलापुरात नुकतेच आले. अजित पवारांच्या पक्षातील अनेकांनी भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे शिंदेही धास्तावले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बहुतांश मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत. त्यांच्याविरोधातील फाईल बंद झालेल्या नाहीत. त्यामुळे या निवडणुका ही शिंदेंसाठी अग्निपरीक्षा असेल. भाजप सोबत राहिला तरच आपण टिकू याची जाणीव शिंदेंना आहे. त्यादृष्टीने त्यांचा प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळेच पालिका निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगून त्यांनी फडणवीसांचे विधान खोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
धंगेकरांनी वाढवले टेन्शन
पुण्यात शिंदेंच्या पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे बेफाम आरोप सुरू केले आहेत. त्यामुळे महायुतीत वितुष्ट येण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांनी समज देऊनही धंगेकर दररोज आरोपांची राळ उडवत आहेत. यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.



























































