भाजपला कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावे लागते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला

महाविकास आघाडीकडून राज्यात स्थापन झालेल्या सरकारला पुठलाही धोका नाही. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. महाविकास आघाडीच्या पाठीशी जोपर्यंत या तिघांचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही. 105 जण निवडून येऊनही सरकार करता आले नाही, हे भाजपचे खरे दुखणे आहे. म्हणून कार्यकर्ते जपण्यासाठी त्यांना गाजर दाखवावे लागते, असा टोला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील प्रीतीसंगमावरील समाधीस्थळी आदरांजली वाहिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईहून आलेल्या यशवंत ज्योतीचे स्वागत यावेळी करण्यात आले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, वीजबिल माफ करण्यासंदर्भात अभ्यास चालू आहे. सर्व प्रकारची मिळून 59 हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहेत. मागील सरकारने अतिशय वेगवेगळे प्रकारचे निर्णय घेतल्यामुळे महावितरण पंपनी अडचणीत आली. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आणि आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, असेही अजित पवार म्हणाले.

अकरावी प्रवेशाबाबत लवकरच जीआर काढला जाणार आहे, त्यानुसार दोन दिवसात निर्णय घेऊ. ईडीच्या कारवाईदरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात हा त्यांचा निर्णय असतो, असेही ते म्हणाले.

केंद्राकडून जीएसटीचे 38 हजार कोटी येणे बाकी

केंद्र सरकारकडून जीएसटीचे 38 हजार कोटी रुपये आजदेखील येणे बाकी आहेत. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना समान वागणूक देऊन मदत केली पाहिजे. मात्र, ती मिळत नाही. देशातील पुठल्याही राज्यात संकट आले तर पुठल्या पक्षाचे सरकार आहे हे न पाहता व भेदभाव न करता केंद्र सरकारने मदत करणे अपेक्षित असते. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना त्यांनी सगळ्याच राज्यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. सध्या कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती मूळ पदावर आणण्यासाठी आपल्याला ज्यांच्याकडून जे येणे आहे, ते आले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या