
महाविकास आघाडीला 170 पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे. मात्र, भाजपची नेतेमंडळी पंढरपुरात येऊन ‘तुम्ही इथला आमदार निवडून द्या, राज्यातलं सरकार पाडून दाखवतो’, अशी वक्तव्ये करीत आहेत. सरकार बदलणे म्हणजे येडय़ा गबाळ्याचे काम नाही, असे सांगत स्वतःचे आमदार फुटून आमच्याकडे येऊ नयेत म्हणून भाजपकडून सरकार बदलाच्या वावडय़ा उठवल्या जात आहेत, असा जबरदस्त पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पंढरपूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, शिवसेनेचे संभाजी शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील, राजेंद्र गवई उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सुरू असलेले राजकारण अत्यंत घाणेरडय़ा पद्धतीने होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रस्ताव होता, असा चुकीचा प्रचार भाजप करीत आहे. मात्र, भाजपनेच सर्वप्रथम उमेदवार जाहीर केला. त्यानंतरच महाविकास आघाडीने उमेदवार दिला, असा टोला पवार यांनी हाणला. मागील काही सभांमध्ये देवेंद्र फडणवीस हे ‘केंद्रातून मंगळवेढा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी आणतो’, असे सांगत आहेत; मग गेली पाच वर्षे राज्यात व केंद्रात त्यांचेच सरकार होते, त्यावेळी त्यांना कुणी अडविले होते, असा सवालही त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरकार बदलायचं माझ्यावर सोडा’, असे विधान प्रचारसभेत केले होते. त्यावर फडणवीसांचे नाव न घेता अजित पवार यांनी आज जोरदार फटकारले. ‘सरकार बदलणे हे दररोज जॅकेट बदलण्यासारखे नाही. कर्नाटक, मध्य प्रदेशात शक्य झाले म्हणजे महाराष्ट्रात शक्य होईल, असे नाही. स्वतःचे आमदार फुटतील या भीतीतून भाजपकडून वारंवार सरकार बदलाचे गाजर दाखविले जात आहे’, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
लोकांचे हित आणि विकासासाठी आम्ही एकत्र आलो असून, भाजपने कितीही टीका केली तरी आम्ही एकत्रच राहू, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, तर देवेंद्र फडणवीस हे वारंवार सरकार पडेल, असे सांगत आहेत. मात्र, ते स्वतः तरी पाच वर्षे विरोधी पक्षनेते राहतील का? अशी शंका असल्याची टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
चंदक्रांत पाटलांचे ऐकू नका
– चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत, सोसायटी, झेडपी अशी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. साधी सहकारी संस्था स्थापन केली नाही. केवळ पंतप्रधान मोदी यांच्या झंजावाताची त्यांना लॉटरी लागली आहे, हे त्यांनी विसरू नये. चंद्रकांत पाटील दररोज वेगवेगळी विधाने करीत असून, ती फारशी गांभीर्याने घेऊ नका. त्यांचे काहीही ऐकून घेण्याची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
गारपिटीचे पंचनामे तातडीने करा
– मागील दोन दिवसांत सोलापूर जिह्यात झालेल्या गारपिटीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यात नुकसान झालेल्यांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पीकविम्याच्या तारखा वाढविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अडचणीत असलेले ‘विठ्ठल’, ‘चंद्रभागा’, ‘भीमा’ साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही पवार यांनी सांगितले.





























































