इतनी डेअरिंग… डायरेक्ट अॅक्शन लुंगा, अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी!

‘इतनी डेअरिंग… मैं डायरेक्ट अॅक्शन लुंगा… मुझे कॉल करने को बोलती है…’ हे पिक्चरमधील डायलॉग नाहीत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध मुरूम उत्खनन रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवर केलेली दमबाजी आहे. अजित पवारांच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र तीक्र संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर कामाला पाठबळ देणाऱया उपमुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

सोलापूर जिह्यातील माढा तालुक्याच्या कुर्डू गावात रस्त्याचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन करण्यात येत आहे. या उत्खननाविरुद्ध करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींवरून अंजली कृष्णा दोन दिवसांपूर्वी कुर्डू गावात गेल्या. या वेळी काही गुंडांनी तहसीलदार, तलाठी यांना लाठय़ाकाठय़ा दाखवत दमबाजी केली. या वेळी टीपर घेऊन गावकरी मोठय़ा संख्येने जमा झाले होते. अंजली कृष्णा यांच्याशी त्यांचा वाद सुरू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते बाबा जगताप यांनी आपल्या मोबाईलवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. अजित पवार यांनी गुंडांना झापण्याऐवजी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दम दिला आणि कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. मात्र अंजली कृष्णा यांनी दाद न देता मला वरिष्ठांना उत्तर द्यावे लागते, असे सांगितल्याने अजित पवारांचा पारा आणखी चढला.

कोण आहेत अंजली कृष्णा

27 वर्षीय अंजली कृष्णा या मूळ केरळच्या असून 2023मध्ये त्या यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस झाल्या आहेत. याअगोदर त्रिवेंद्रम येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केले. 2024पासून त्या सोलापूर जिह्यात कार्यरत आहेत. सध्या त्या करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दादागिरीला न जुमानता थेट बोलणाऱया अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र चर्चा आहे.

अजित पवारांनी राजीनामा द्यावा, नाहीतर मोर्चा काढू

अजित पवार दादागिरी, धटिंगशाही करत आहेत. एकीकडे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणतात आणि दुसरीकडे एका महिला अधिकाऱयाला दमदाटी करतात. अजित पवार यांनी तातडीने महिलांची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अंजली कृष्णा नडल्या…

कारवाई थांबवण्यासाठी अजित पवार गटाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून अजित पवार यांना फोन लावून तो अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. तेव्हा झालेला संवाद…

अजित पवार – मै डेप्युटी चीफ मिनिस्टर आपके साथ बात कर रहा हू. आपको आदेश देता हूं. कारवाई रूकवा दो और जाके डॉ. शेलार को बोलो की अजित पवारजी का फोन आया था.

अंजली कृष्णा – आप मेरे फोन पे डायरेक्ट कॉल करो ना…

अजित पवार – मै तेरे पे अॅक्शन लुंगा. अभी मै आपके साथ बोल रहा हू और आप मुझे डायरेक्ट कॉल करने को बोल रही है.

अंजली कृष्णा – जो आप बोल रहे हो मै समझ रही हू लेकीन…

अजित पवार – तुझे मुझे देखना है ना. एक काम करो तेरा नंबर दे दो या मुझे व्हॉट्सअॅप कॉल करो. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना.

अंजली कृष्णा – ठिक है सर…

अजित पवार – इतना आपको डेअरिंग हुआ है क्या?

अंजली कृष्णा – मैने जो कारवाई की है वो मुझे पता है. बाकी पता नही.