
सारंगखेडय़ाच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये गुजरातमधून आलेला ‘ब्रह्मोस’ घोडा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. या घोडय़ाची किंमत तब्बल 15 कोटी रुपये असल्याची चर्चा असून यामुळे तो देशातील सर्वात महाग घोडय़ांपैकी एक मानला जातो.
‘ब्रह्मोस’ हा मारवाडी जातीचा, काळ्या रंगाचा आणि कपाळावर आकर्षक पांढऱया पट्टय़ाचा अत्यंत राजेशाही ठेवणीचा अश्व आहे. गुजरातचे नागेश देसाई यांच्या ‘देसाई स्टडफॉर्म’वर या घोडय़ाचे लहानपणापासून संगोपन करण्यात आले आहे.
पुष्कर बाजारात या घोडय़ासाठी आठ कोटींची बोली लागली होती तरीही देसाई कुटुंबाने ‘ब्रह्मोस’ विक्रीला नकार दिला. 36 महिन्यांचा आणि तब्बल 63 इंच उंच असलेला ‘ब्रह्मोस’ सध्या देशातील टॉप परफॉर्मन्स घोडय़ांमध्ये गणला जातो. ‘ब्रह्मोस’च्या अपार लोकप्रियता, किंमत आणि राजेशाही थाटामुळे हा घोडा चर्चेत आहे.
दररोज 15 लिटर दूध आणि पौष्टिक खुराक
‘ब्रह्मोस’च्या देखभालीत दररोज 15 लिटर दूध, पौष्टिक खाद्य, मसाज आणि ग्रुमिंगसाठी स्वतंत्र मजूर अशा विशेष सोयी आहेत. देशभरातील अनेक अश्व स्पर्धांमध्ये ‘ब्रह्मोस’ने नंबर वन घोडा म्हणून आपली छाप सोडली आहे. देसाई स्टडफॉर्मवर ‘ब्रह्मोस’च्या ब्रीडिंगमधून आतापर्यंत 10 पिल्ले तयार झाली असून या पिल्लांवर लाखोंच्या बोली लागल्या आहेत.

























































