शास्त्रज्ञांनी शोधला वाळवंटात राहणारा मासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मासे म्हटलं की आपोआप आपल्या डोळ्यासमोर पाण्याचे स्रोत येतात. कधी नदी, कधी खाडी, कधी समुद्र अशा विविध ठिकाणी त्यांचं अस्तित्व असतं. पण, तुम्हाला कुणी सांगितलं की वाळवंटातही मासा राहू शकतो..तर? ऐकून विश्वास बसणार नाही. पण, शास्त्रज्ञांनी खरोखर असा मासा शोधून काढला आहे, जो वाळवंटात राहतो.

या माश्याचं नाव डेझर्ट रेनबो फिश असं आहे. या माश्याला शास्त्रीय भाषेत मेलानोटेनिया स्प्लेडिडा टेटेई असं म्हणतात. काही काळापूर्वीच लावलेल्या एका शोधात या माश्याच्या अस्तित्वाची माहिती कळली आहे. डेझर्ट रेनबो फिशची लांबी चार इंच इतकी असते. हा मासा चक्क वाळवंटात राहतो. तिथल्या उष्ण वातावरणाशी जुळवून घेत तो तिथेच वास्तव्य करतो.

हे मासे बहुतांश प्रमाणात ऑस्ट्रेलियाच्या मध्य भागातील वाळवंटी प्रदेशात आढळले आहेत. हा प्रदेश जवळपास 3 हजार किलोमीटर लांब-रुंद आहे. या परिसरात काही प्रमाणात मानवी वस्ती आहे. कारण, उजाड आणि वैराण भागामुळे इकडचं तापमान फारसं चांगलं नाही. पावसाचं प्रमाण देखील कमी आहे. या परिसरात अध्ये-मध्ये पिण्याच्या पाण्याचे काही नैसर्गिक स्रोत आहेत. पण, ते खूपच छोटे आहेत. असं असूनही या स्रोतांमध्ये हे मासे तग धरून आहेत. तसं अनुकूलन त्यांच्यात विकसित झालं आहे.

हे मासे संख्येने कमी आहेत, पण ते सगळे अशा प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहिले आहेत. फ्लिंडर्स विद्यापीठाचे प्राध्यापक लुसियानो बेरेगेरे आणि त्यांच्या पथकाने या माश्यांचं निरीक्षण करून अभ्यास केला. तेव्हा त्यांना आढळलं की हे मासे ऑस्ट्रेलियातील 18 वेगवेगळ्या प्रदेशात आढळतात. त्यांची जनुकीय संरचना अभ्यासल्यानंतर त्यांनी त्यांचा फिश आऊट ऑफ वॉटर नावाचा प्रबंश इव्होल्युशन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला.

त्यांच्या प्रबंधानुसार, या माश्यांमध्ये 8 अशी जनुकं असतात जी त्यांना अशा परिस्थितीत अनुकूलन प्रदान करतात. गंमत म्हणजे हे सगळे मासे 18 वेगवेगळ्या ठिकाणी राहून देखील समान प्रकारचं अनुकूलन अनुभवतात. वास्तविक इतक्या कमी संख्येचे जीव अशा प्रकारचं अनुकूलन विकसित करत नाहीत, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. मात्र, हे मासे त्याला अपवाद आहेत.

काही रेनबो फिश वाहत्या पाण्यात राहतात. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असते. पण, दुष्काळ असेल त्या काळात हे मासे जमिनीत बनलेल्या खड्ड्यांमध्ये सुरक्षित राहतात. जेव्हा पाण्याची पातळी वाढते तेव्हा ते प्रजनन करतात. कारण, पाण्याच्या तुलनेने त्यांची संख्या वाढते. त्यामुळे दुष्काळ पडून त्यातले काही मासे जरी मेले तरी त्यांची संख्या कमी होत नाही.