
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याविरोधातील लीलावती हॉस्पिटलमधील तक्रारींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
देशमुख म्हणाले की, लीलावती हॉस्पिटल हे मुंबईतील अत्यंत नामांकित आणि प्रख्यात रुग्णालय आहे. त्या ठिकाणच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजने परमवीर सिंह यांच्याविरोधात गंभीर तक्रारी केल्या आहेत. सिंह हे मुंबईचे पोलीस आयुक्त राहिल्यानंतर लीलावती हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर गेले होते. ट्रस्टी आणि डॉक्टरांकडून त्यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असून, डॉक्टरांकडून प्रत्येकी 25 लाख रुपये घेतल्याचे आरोपही समोर आले आहेत. या वादग्रस्त कारकीर्दीमुळे त्यांना संचालक पदावरून हटवण्यात आल्याच्या बातम्या आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
देशमुख म्हणाले की, आपण राज्याचे गृहमंत्री असताना मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती. त्या वेळी परमवीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. मात्र त्यांच्या चौकशीबाबत शासनाला संशय वाटल्याने ही चौकशी एटीएसकडे सोपवण्यात आली. एटीएसच्या चौकशीत काही बाबी समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांची कमी महत्त्वाच्या पदावर बदली केली आणि पुढे त्यांना निलंबितही करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्यावर आरोप केले होते, असे देशमुख यांनी सांगितले.
देशमुख यांनी सांगितले की, त्यांनी स्वतःवर झालेले आरोप तपासले जावेत, अशी मागणी केली होती. त्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सुमारे 11 महिने चौकशी केली. त्या दरम्यान देशमुखांच्या वकिलांनी परमवीर सिंह यांना कोर्टात हजर करण्याची मागणी केली. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी समन्स बजावले, मात्र पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या समन्सनंतरही सिंह कोर्टात हजर झाले नाहीत. एकूण सहा समन्स बजावूनही ते हजर झाले नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात पकड वॉरंट काढले. पकड वॉरंट निघाल्यानंतर ते फरार होऊन परदेशात गेल्याच्या बातम्या त्या वेळी समोर आल्या होत्या. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी कोर्टात येऊन पुरावे सादर करायला हवे होते, असे देशमुख म्हणाले.
आता लीलावती हॉस्पिटलमध्येही त्यांच्या विरोधात तक्रारी आल्यामुळे त्यांना संचालक पदावरून हटवण्यात आले असून ते तिथल्या ट्रस्टींवरही आरोप करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.


























































