
कबुतरांना दाणापाणी देण्यावर बंदी घालण्यात आली असली तरी जैन समाज हट्ट सोडण्यास तयार नाही. दादर-माहीम कबुतरखाना भागात कारवाई सुरू केल्यामुळे आता जैन धर्मियांनी दादर-प्रभादेवी चौपाटीवर सकाळच्या वेळेत कबुतरांना दाणापाणी देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून आता स्थानिक आणि कबुतरांना खाद्य देणाऱयांमध्ये बाचाबाची होण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईतील कबुतरखान्यांत कबुतरांना दाणापाणी देण्यावर आता बंदी आली आहे. माहीमच्या कबुतरखान्यामध्ये कबुतरांना खाद्य दिल्यामुळे पहिला गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईच्या ज्या भागात कबुतरांना खाद्य दिले जाते त्या भागात आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कबुतरांना खाद्य दिल्यास दंड आकारण्यात येईल, असे फलकही लावले आहे. त्यामुळे आता कबुतरांना खाद्य देण्यासाठी जैन धर्मियांनी वेगवेगळ्या मोकळ्या जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. दादर-प्रभादेवी चौपाटीवर सकाळी गर्दी कमी असते. तिथे सध्या जैन धर्मीय पिशवीतून खाद्य घेऊन येतात आणि वाळूत खाद्य टाकतात. पूर्वी चौपाटीवर कबुतरांची संख्या कमी होती. पण आता खाद्य देण्यास सुरुवात झाल्यामुळे चौपाटीवर कबुतरांची संख्या लक्षणीयरित्या अचानक वाढली आहे. कीर्ती कॉलेज परिसरात काही दिवसांपूर्वी रस्त्यावर काही लोक कबुतरांना खायला खाद्य देत होते. तेव्हा स्थानिकांनी आक्षेप घेतला. तेव्हा कबुतरांना खाद्य देणारे आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली होती.
मॉर्निंग वॉकर्सच्या आरोग्याला धोका
चौपाटीवर सकाळच्या वेळेस प्रदूषणमुक्त वातावरण असल्याने दादर-प्रभादेवी चौपाटीवर मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. परंतु आता कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.