देवनार डंपिंग ग्राऊंड वीजनिर्मिती प्रकल्पावरून भाजपची कोलांटउडी

311

मुंबईत कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱया देवनार डंपिंग ग्राऊंड वीज निर्मिती प्रकल्पाला शिवसेनेसह सर्वपक्षीयांसोबत स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार पाठिंबा देणाऱया भाजपने आज मात्र सपशेल कोलांटउडी मारली. या प्रस्तावात गैरव्यवहार झाल्याचे सांगत नव्याने निविदा मागवाव्यात अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. दरम्यान, भाजपची बदललेली भूमिका म्हणजे नाहक केलेले राजकारण आणि नौटंकी असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंडवर दररोज 600 मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे कंत्राट पालिका प्रशासनाने अयोग्य पद्धतीने चेन्नई एमएसडब्ल्यू कंपनीला देण्याचा घाट घातला होता. मात्र सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाची पोलखोल केली. निविदा प्रक्रियेत पालिका प्रशासनाने ‘चैन्नई’ कंत्राटदाराला काम देण्यासाठी जाणीवपूर्वक फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे निर्धारित पद्धतीने निविदा भरणाऱया सुएज एन्व्हारमेंट इंडिया प्रा. लि. कंपनीलाच वीजनिर्मितचे कंत्राट द्यावे अशी उपसूचना त्यांनी मांडली. याला विरोधी पक्ष नेते रवी राजा, ‘भाजप’चे प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, ‘सपा’चे रईस अशा सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यामुळे एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

भाजपला विश्वास नाही!

देवनार डंपिंग ग्राऊंड वीज प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रस्तावात जाणीवपूर्वक फेरफार करणाऱया पालिका प्रशासनाविरोधातील उपसूचनेला शिवसेना, विरोधी पक्षांसह भाजपनेही पाठिंबा दिला. प्रशासनाने यावेळी आपली चूक मान्यही केली. त्यामुळेच सुएज कंत्राटदाराला काम देण्याच्या उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र भापजकडून आता पुन्हा निविदा काढण्याची मागणी म्हणजे आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नसल्याचे दाखवण्याचा प्रकार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या