मुंबईचा विकास करताना पर्यावरणाला धक्का लागणारच! महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईसारख्या शहरामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरणाला धक्का लागणारच असे स्पष्ट मत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. पर्यावरणाचे जतन करतानाच पायाभूत सुविधांचा विकासही झाला पाहिजे आणि त्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

पर्यावरणाला फारसे धोक्यात न आणता मेट्रो प्रकल्पाची उभारणी सुरू असल्याचे राजीव यांनी सांगितले. मेट्रो ही ऊर्जेची बचत करणारी आणि प्रदूषण कमी करणारी आहे असे सांगतानाच लोकलमुळे रोज नाहक जाणारे बळीही मेट्रोमुळे वाचू शकतील असे राजीव यांनी ठामपणे सांगितले. अतिरिक्त प्रवासी वाहून नेणे आता उपनगरीय लोकलला अशक्य होऊ लागल्यानेच मेट्रोसारख्या कार्यक्षम बहिणीची तिला गरज आहे असे त्यांनी सांगितले.

35 टक्के लोकल प्रवासी मेट्रोकडे वळतील

मेट्रोमुळे लोकलवरचा ताण बऱ्याच अंशी कमी होणार आहे. मेट्रो-1 मधून प्रवास करणाऱ्या चार लाख लोकांना पाहिले की याचा अंदाज येतो. 35 टक्के लोकल प्रवासी मेट्रोकडे वळतील असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे त्या लोकांना त्यांच्या गाडय़ा घरी ठेवाव्या लागतील. परिणामी त्यांचा इंधनावरचा खर्च वाचेल आणि पर्यावरणालाही त्यामुळे मदत होईल असे आयुक्त राजीव यांनी सांगितले.