
मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असले तरी घाटकोपर विभागात तब्बल 46 कामांची वर्क ऑर्डर देऊनही ही कामे सुरूच झाली नसल्याचे समोर आले आहे. शिवाय 2021 मध्ये हाती घेतलेली कामेही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे वाहनचालक-रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पालिकेच्या अखत्यारीत दोन हजार किमीचे रस्ते असून हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण पालिकेकडून राबवण्यात येत आहे. यामध्ये आता खुद्द मुख्यमंत्र्यांकडून वेगाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सहा हजार कोटींच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. यासाठी पाच कंत्राटदारांची नेमणूकही करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी ही कामे रखडल्याचे चित्र आहे. घाटकोपर, विद्याविहारमध्ये डिसेंबर 2021मध्ये रस्त्यांच्या कामांना वर्क ऑर्डर देऊनही ही कामे रखडली आहेत. त्यामुळे ही कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी काँग्रेसचे दीपक जाधव यांनी पालिका, मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही कामे का रखडली याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.



























































