
पालिकेच्या माध्यमातून दक्षिण मुंबईत रस्ते, पूल आणि जंक्शन सुशोभीकरणासारखी विकासकामे सध्या वेगात सुरू आहेत. या विकासकामांचा आढावा पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून घेतला. ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
वरळीतील पालिकेच्या लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राजवळ निर्मिती अवस्थेत असलेल्या प्रकल्प समादेश केंद्र, बी. जी. खेर मार्गाची पुनर्बांधणी या कामांची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.शिवाय महालक्ष्मी मंदिराजवळील कॅडबरी जंक्शन आणि केम्प्स कॉर्नर उड्डाणपुलाखालील जंक्शनचे सुशोभीकरण या प्रस्तावित कामांच्या जागीदेखील त्यांनी पाहणी करून आवश्यक ते निर्देश दिले. वरळी येथील कला व हस्तकला वास्तू केंद्राच्या जागी बहुपयोगी प्रोजेक्ट्स कमांड सेंटर उभारले जात आहे. या केंद्रातून पालिकेचे मलनिसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते इत्यादी विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांचे नियोजन केले जाणार आहे. या केंद्राचे सुमारे 65 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून वेगाने काम होत असल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, विशेष अभियांत्रिकी उपआयुक्त अजय राठोर, पायाभूत सुविधा उप आयुक्त उल्हास महाले, पर्यावरण उपआयुक्त अतुल राव, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड उपस्थित होते.
या कामांची पाहणी
– देशातील पहिला उड्डाणपूल अशी ओळख असलेला, 1965 मध्ये बांधण्यात आलेला केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल हा दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी असलेला महत्त्वाचा मार्ग आहे. या उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
– 5 ऑगस्ट 2020 रोजी जोरदार पावसामुळे ‘डी’ विभागातील न्या. सीताराम पाटकर मार्गालगतची संरक्षक भिंत कोसळून भूस्खलन झाले होते. त्याप्रसंगी वरच्या बाजूस असलेल्या बी. जी. खेर मार्गाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या ठिकाणी संरक्षक भिंत पूर्ण झाली असून बी. जी. खेर मार्गाचे काम होत आहे.
बोरिवली, एस. व्ही. रोडवरील वाहतूककोंडी फोडणारा कोरा केंद्र पूल आजपासून सेवेत
बोरिवली, ‘एस. व्ही.’ रोडसह परिसराची वाहतूककोंडी फोडणारा आर. एम. भट्टड मार्गावरील कोरा केंद्र उड्डाणपूल उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पूर्व-पश्चिम आणि पश्चिम-पूर्व अशा चार लेन असणाऱ्या, मजबूत आणि आकर्षक रोषणाई असणाऱ्या या पुलासाठी पालिकेने 173 कोटींचा खर्च केला आहे. या पुलाचे लोकार्पण पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
कोरा केंद्र पुलामुळे लिंक रोडवरून थेट पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाता येईल. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरून हा पूल विस्तारित झाला असल्यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार असल्याने वेळेचीही बचत होणार आहे. या पुलाच्या लोकार्पणप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार सुनील शिंदे, राजहंस सिंह, पालिका आयुक्त-प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू उपस्थित राहणार आहेत.





























































