पोलीस आयुक्त कार्यालयात दहा वर्षांचा रेकॉर्डब्रेक कार्यकाळ, भारती यांनी 11 ‘आयपीएस’ना मागे टाकले

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख सदानंद दाते यांच्यासह 11 ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना मागे टाकून देवेन भारती यांनी मुंबईचे पोलीस आयुक्तपद पटकावले. यामागे त्यांची गुणवत्ता, कार्यक्षमता व तपश्चर्या असल्याचे पोलीस दलात बोलले जात आहे.

11 मे 2007 रोजी देवेन भारती यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयात प्रवेश केला आणि जगभरात नावलौकिक असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपायुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मधल्या काही वर्षांचा कार्यकाळ वगळता त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय कधी सोडले नाही. डिटेक्शन क्राईम ब्रँचचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त म्हणून गुन्हे शाखेची चार वर्षे सूत्रे सांभाळली. अंडरवर्ल्ड व अतिरेक्यांच्या नांग्या ठेचल्या. क्राईम ब्रँचमध्ये सलग चार वर्षे, त्यानंतर सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) चार वर्षे व विशेष पोलीस आयुक्त म्हणून दोन वर्षांपेक्षाही अधिक काळ म्हणजे दहा वर्षे मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेला हा पहिलाच आयपीएस अधिकारी आहे.

देवेन भारती यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात कर्तव्य बजावलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे रेकॉर्ड मोडले आहेत. असा हा अद्भुत अधिकारी 2028 साली सेवानिवृत्त होणार असून एम. एन. सिंग यांच्याप्रमाणे देवेन भारतीही पोलीस आयुक्त म्हणून पोलीस आयुक्त कार्यालयातच सेवानिवृत्त होतील, अशी शक्यता पोलीस दलातील त्यांचे हितचिंतक व्यक्त करीत आहेत. परंतु देवेन भारतींसाठी सेवाज्येष्ठता डावलली गेल्याने महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ माजली आहे; परंतु मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी सेवाज्येष्ठता हा निकष नसल्याने यापूर्वी रणजित शर्मा, राकेश मारिया आदींसाठी सेवाज्येष्ठता डावलण्यात आल्याची उदाहरणे आहेत, असे सांगितले जाते.