ज्यांनी वाट लावली त्यांना आम्ही वाट दाखवली! मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना चिमटे

1479
Devendra fadanvis chief minister maharashtra

‘ज्यांनी या राज्याची वाट लावली त्यांना आम्ही वाट दाखवली, त्यांना आमच्यात घेतलंच नाही’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. या दोन पक्षातील नेत्यांना कोणत्या निकषाच्या आधारे भाजपमध्ये घेतले या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की त्यांच्यावर गुन्हे नाहीत किंवा आरोप नाही अशा नेत्यांना आम्ही आमच्या पक्षात घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख करताना सांगितले की या दोघांवर कोणतेही आरोप नव्हते ज्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेण्यात आले. ईडीची चौकशी ज्यांच्याविरुद्ध सुरू आहेत त्यांना आम्ही पक्षात स्थान देणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने भाजपवर आरोप करण्यात येत आहे की ते फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की त्यांचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष फोडले आज त्यांच्यासोबत तसंच होतंय. इंडीया टुडेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांची तुलना शरद पवार यांच्या राजकारणाशी करण्यात आली. तुम्हाला 21 व्या शतकातील शरद पवार असे म्हटले जाते असे सूत्रसंचालकाने म्हटले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की मी ‘शरद पवार का बनू? मी देवेंद्र फडणवीस आहे.’ फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की ‘मला शरद पवार जसे राजकारण करतात तशा राजकारणाची गरज नाही. ज्या प्रकारचे राजकारण ते करत होते ते राजकारण आता चालू शकत नाही.’

मुख्यमंत्र्यांना आगामी विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ठाम शब्दात सांगितले की ही निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार आहेत. गेल्या 40 वर्षातील हे बहुधा पहिलेच सरकार असावे ज्यांच्यावर गेल्या 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असं फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांनी केलेल्या चिक्की घोटाळ्याच्या आणि प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा पुराव्यनिशी आरोप करत होतो आणि आम्ही ते कधीच परत घेत नव्हतो. सध्याचे विरोधक हे एकही आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या