गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळणाऱ्यांना सीसीटीव्हीमुळे लगाम

एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळणाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे लगाम लागला आहे. अशा आरोपींना तत्काळ अटक करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पूर्वी दुसऱ्या राज्यात पळून जाणाऱ्या आरोपींना पकडणे सोपे नव्हते. मात्र महाराष्ट्रातील सर्व शहरे सीसीटीव्हीने जोडली गेल्यामुळे अशा आरोपींना तत्काळ अटक करणे शक्य झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

शिक्षेचा दर वाढला

2013मध्ये शिक्षेचा दर अवघा 9 होता. म्हणजे 100पैकी 91 आरोपींची सुटका व्हायची. आता हा दर 53 टक्के झाला आहे. 14 शासन निर्णयांमुळे हे शक्य झाले आहे. केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्यांमुळे हा दर 90 टक्क्यांपर्यंत पोहोचला, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत

तंत्रज्ञानामुळे पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचतात. पूर्वी साक्षीदार फुटायचे. पुराव्यांची साखळी पूर्ण व्हायची नाही. याचा फायदा आरोपींना मिळायचा. आता ही परिस्थिती बदलली आहे. नवीन कायद्यांमुळे ते शक्य झाले आहे, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.