कोल्हापूर येथील परिस्थिती नियंत्रणात, देवेंद फडणवीस यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या तणावाबाबत ते माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

औरंगजेबाचे पोस्टर स्टेटस म्हणून ठेवल्याच्या निषेधार्थ हिंदुत्वावादी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. तरीही कोल्हापुरात अनेक संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने बुधवारी तणाव निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना तेथील सद्यपरिस्थितीची माहिती दिली.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, औरंग्याच्या एवढ्या अवलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या, याचा शोध आपल्याला लावावा लागेल. याच्या पाठीमागे हे देखील शोधावं लागेल, जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, याकरता तर या अवलादी पैदा झालेल्या नाहीत ना, हे देखील तपासून पाहावं लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की कायदा आणि सुव्यवस्था खराब होणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यावी, कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

फडणवीस पुढे म्हणाले की, अशा औरंग्याच्या अवलादींना आम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. कुणीही औरंगजेबाचं उदात्तीकरण करू शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पण, हे जे नव्याने पैदा झालेले आहेत, यांचे खरे बोलविते धनी कोण आहेत, ते शोधून काढावं लागेल आणि ते आम्ही शोधून काढू. पण, महाराष्ट्रासारख्या राज्यात कायदा हातात घेतल्यामुळे एकिकडे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण तर होतोच पण, त्यासोबत महाराष्ट्राचा एक औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्यावरही यामुळे डाग लागतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की कुणीही कायदा हातात घेऊ नये. कुणी जर तो घेतला तर त्यावर कारवाई करावी लागेल. महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी केलं, तर साहजिक संताप निर्माण होतोच. फक्त अशा प्रकारच्या संतापामध्ये कायदा हातात घेणं हे योग्य नाही, त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.