‘काळजीवाहू’च्या मर्जीतले अधिकारी ‘काळजी’त! वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralaya-5

>> राजेश चुरी

राज्याच्या विधानसभेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील मुख्यमंत्री कोण हे अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील वित्त, महसूल, नगरविकास आणि गृह खात्यातील  सनदी अधिकाऱ्यांचे (आयएएस) धाबे दणाणले आहे, तर मुख्यमंत्र्याच्या खप्पामर्जीतील सनदी अधिकाऱ्यांना आता महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले आहेत.

राज्यातील विधानसभेची मुदत संपुष्टात आल्यावर सत्तास्थापना झाली नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राजशकट चालवण्यास सांगितले आहे. मात्र यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील सरकारी सेवेतील सनदी अधिकारी काळजीत पडले आहेत. ‘मी परत येईन’ असा निरोप मुख्यमंत्र्यांनी धाडल्यामुळे त्यांच्या मर्जीतील सनदी अधिकारी निश्चिंत होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय चित्र बदलल्याने मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्वतःच्या भवितव्याची चिंता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यांच्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांची मोक्याच्या जागी वर्णी लावली. वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना तर निवृत्तीनंतरही क्रीम पोस्टिंग दिले आहे. पायाभूत सुविधांच्या खासकरून मेट्रो प्रकल्पाच्या जबाबदारीच्या नावाखाली अश्विनी भिडे यांना प्रचंड अधिकार बहाल केले. त्यातून आरेतील वृक्षतोडीचे प्रकरण प्रचंड गाजले. अश्विनी जोशी यांनी स्वतःच्या मर्जीतील एका सनदी अधिकाऱ्याला ठाणे जिल्हाधिकारी, मुंबई जिल्हाधिकारी, अबकारी शुल्क विभाग आणि आता पालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद अशी क्रीम पोस्टिंग बहाल केली. कोणालाच जुमानत नसल्याने महापालिकेत अश्विनी जोशी यांच्या विरोधात शिवसेनेने अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली होती. इरॉस चित्रपटगृहातील एका न्यायालयीन प्रकरणात त्यांच्या विरोधात न्यायालयाने अतिशय गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले होते.  मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांनी प्रवीण परदेशी या स्वतःच्या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्याचा फायदा मुख्यमंत्र्यांना आरेच्या कारशेडमधील झाडे कापण्याच्या वेळेस झाला. आरेतील झाडे कापण्यास शिवसेनेचा विरोध होता. मुख्यमंत्र्याच्या मर्जीतील आयुक्तांनी सत्ताधारी पक्षाला डावलून प्रस्ताव मंजूर केल्याचे दिसून आले. नागपूरचे प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, मिलिंद व मनीषा म्हैसकर दांपत्य, सचिन कुर्वे, भूषण गगरानी, आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग हे अधिकार तर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात. ब्रिजेश सिंग तर आयपीएस अधिकारी आहेत, पण त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क महासंचालक खात्याचा कार्यभार सोपवून सायबर क्राइम हा विभाग कायम ठेवला आहे. आयआरएस कॅडरमधील पल्लवी दराडे व सुधाकर शिंदे यांच्याकडे सनदी अधिकाऱ्याची जबाबदारी देऊन क्रीम पोस्टिंग दिलेले आहे. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांमधील एक गट मुख्यमंत्र्यांवर प्रचंड नाराज आहे.

> वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना तर निवृत्तीनंतरही क्रीम पोस्टिंग

> मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांनी प्रवीण परदेशी या मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती

> ब्रिजेश सिंग हे आयपीएस अधिकारी आहेत, पण त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क महासंचालक खात्याचा कार्यभार सोपवून सायबर क्राइम हा विभाग कायम.

अडगळीतील अधिकाऱ्यांना धुमारे

मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या एका गटाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या मर्जीतील-विश्वासातील सनदी अधिकाऱ्याची मोक्याच्या जागी नियुक्ती करतो, पण त्यांच्यावर मर्जी नाही अशा अधिकाऱ्यांना नॉन क्रीम पोस्टिंगवर नियुक्ती दिली जाते. मुख्यमंत्र्यांच्या दराऱ्यामुळे सनदी अधिकारी व इतर अधिकारीवर्ग पत्रकारांशी अनौपचारिक गप्पाही मारण्यास तयार नाहीत. मात्र परिस्थिती बदलत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खप्पामर्जीमुळे अडगळीत पडलेल्या सनदी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागल्याचे चित्र मंत्रालयात दिसत आहे.

 > पायाभूत सुविधांच्या, खासकरून मेट्रो प्रकल्पाच्या जबाबदारीच्या नावाखाली अश्विनी भिडे यांना प्रचंड अधिकार बहाल

> अश्विनी जोशी या स्वतःच्या मर्जीतील एका सनदी अधिकाऱ्याला ठाणे जिल्हाधिकारी, मुंबई जिल्हाधिकारी, अबकारी शुल्क विभाग आणि आता पालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद अशी क्रीम पोस्टिंग

> आयआरएस कॅडरमधील पल्लवी दराडे व सुधाकर शिंदे यांच्याकडे सनदी अधिकाऱ्याची जबाबदारी देऊन क्रीम पोस्टिंग दिलेले आहे. त्यामुळे सनदी अधिकाऱ्यांमधील एक गट मुख्यमंत्र्यांवर प्रचंड नाराज

> नागपूरचे प्रवीण दराडे, पल्लवी दराडे, मिलिंद व मनीषा म्हैसकर दांपत्य, सचिन कुर्वे, भूषण गगरानी, आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंग हे मुख्यमंत्र्याच्या मर्जीतील