गरीब रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत द्या, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

कोरोनात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात असले तरी रूग्णालयांकडून टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे.

इंजेक्शनच्या खरेदीसाठी रुग्णालयांकडून रुग्णांना थेट केमिस्टकडे जाण्यास सांगितले जात आहे. पण या इंजेक्शनच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी मृत्युचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनाकडे हा साठा तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात केली आहे.