घड्याळाला देवाभाऊ चावी देताहेत! राजकीय वर्तुळात चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा एकीकडे सुरू होती. त्यातच घाईगडबडीत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकण्यात आला. यावरून दोन्ही पक्ष एकत्र येण्यात भाजपकडून खोडा घातला जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी अजितदादांच्या पक्षाच्या घड्याळाला देवाभाऊ चावी देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजितदादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असते तर भाजपला त्याचा फारसा फरक पडला नसता. सद्य परिस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र आल्यास राष्ट्रवादी पक्षाची सर्व सूत्रे शरद पवार यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या पक्षातील नेते आणि आमदार शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली येऊ नयेत यासाठी घाईघाईत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सर्व सूत्रे सोपविण्याची खेळी अजित पवार गटाच्या धुरिणांना हाताशी धरून केल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार यांच्या पश्चात दोन्ही पक्ष एकत्र आल्यास पक्षातील आपले अस्तित्व संपेल अशी भीती अजित पवार गटातील काही नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चावीने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर सुरू ठेवण्याची किमया साधली आहे.

राज्यात प्रबळ विरोधी पक्ष तयार होऊ नये असे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. त्यातूनच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांत फुट पाडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आगामी काळात भाजपसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता असल्यानेच पवार कुटुंबातील संघर्षाला खतपाणी घालण्याचे काम भाजपकडून केले जात आहे.