देवगड शहरात क्वारंटाईन असलेल्या तरुणाची आत्महत्या

337

देवगड शहरातील एका खासगी लॉज मध्ये पेड क्वारंटाइन असलेल्या रणजित सुनील घाडीवटार-मोहिते (22, रा.कोल्हापूर) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याने देवगड परिसरात खळबळ माजली आहे.

सदरची घटना 29 जून रात्री 11 ते 30 जून स 11.30 च्या दरम्यान घडली आहे. या संदर्भात तुषार दाजी तोडणकर (रा.नलावडे कॉम्प्लेक्स) यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुण हा वाडतर येथील अनंत ढोके यांच्याकडे कामानिमित्त होता. तो कोल्हापूर येथे जाऊन आपल्या आईला भेटून आल्यानंतर त्याची राहण्याची व्यवस्था 21 जून पासून देवगड येथील खासगी लॉजमध्ये करण्यात आली होती.

29 जून रोजी रात्रौ 11 वाजेपर्यत तो खोलीत आढळला होता. 30 जून रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा घेऊन जाणारी व्यक्ती त्या ठिकाणी डबा घेऊन गेली असता त्याने दरवाजा न उघडल्याने लॉज मालक व अनंत ढोके यांच्याशी संपर्क साधून त्यांना कळविण्यात आले. ढोके यांनी आपल्या साथीदारासोबत त्याठिकाणी येऊन फोनद्वारे त्या युवकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताच प्रतिसाद न आला नाही.

दरम्यान, ढाकेंच्या साथीदाराला खिडकीच्या फटीतून त्याचे पाय हवेत दिसले. अखेर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला असता त्या तरुणाने छतास असलेल्या हुकास दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.डी कांबळे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या