
देवगड इथे मोंड खाडीकिनारी सापडलेल्या पोत्यामध्ये हात पाय धड तोडलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मोंड पोलीस पाटील जितेंद्र राणे यांनी मोंड चिंचवड येथे खाडीकिनारी पाण्यात सिंमेटचे पोते आढळले असून कुजलेला वास येत आहे, असे देवगड पोलीस स्टेशनला कळवले. यानंतर देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर सिमेंटच्या पोत्यात बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला.
मृत बिबट्याचे हात पाय व शिर तोडलेले होते.याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रीतसर पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.























































